“चाळीस लाख खंडणी प्रकरणातील आरोपींना अटक

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
पुलगाव 08/07/2021
येथील किशोर चुन्नीलाल कल्पे यांना चाळीस लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून यातील एकाला सुरतच्या सौराष्ट्र मधून तर दुसऱ्याला पुलगावच्या नदी फैल भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले .पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
13 जून रोजी किशोर चुन्नीलाल कल्पे राहणार मिरा कॉलनी,पुलगाव यांचे मोबाईल वर अज्ञात इसमाने कराची येथून बोलत असल्याचे सांगत 40 लाखांच्या खंडणीची मागणी केली. ही बाब पोलिसांकडे नेल्यास मुलांचे अपहरण करण्याची धमकी दिली होती .त्याप्रमाणे या प्रकरणी कल्पे यांनी पुलगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करीत गुन्हे शाखेचे राजेंद्र हाडके, संजय पटले,पंकज टाकोणे, शरद सानप यांच्या पथकाने तपास सुरू केला. कोणताही पुरावा नसताना शिताफीने गुजरात राज्यातील सुरत येथून आरोपी निकुंज डोबरिया (वय 26) याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने पुलगावच्या नदी फैल येथील साथीदार हर्षल मेश्राम( वय 22) याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दोघांनी तपासात गुन्हा कबुल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दहिलेकर ,गुन्हे शाखेचे प्रमुख राजेंद्र हाडके, पोलिस कॉन्स्टेबल संजय पटले, पंकज टाकोने ,महादेव सानप, शरद सानप, सचिन बागडे यांच्या पथकाने केली .पुढील तपास सुरू आहे.