अभिनेते म्हणतात गुटखा खा तर क्रिकेटर म्हणतात जुगार खेळ…!

आपल्या देशात जर सर्वाधिक ( चाहते ) फॅन फॉलोअर्स कोणाचे असतील तर ते चित्रपटात काम करणारे अभिनेते आणि क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेट खेळाडूंचे. कारण चित्रपट आणि क्रिकेट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सिनेमा आणि क्रिकेट शिवाय भारतीयांचे जीवन अपूर्ण आहे. एकप्रकारे सिनेमा आणि क्रिकेट हे भारतीयांचे श्वास आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. क्रिकेट तर आपल्याकडे धर्म मानला जातो आणि काही प्रेक्षक चित्रपट अभिनेत्यांना देव मानून त्यांची पूजा करतात. दक्षिणेत तर अनेक अभिनेत्यांची मंदिरे देखील उभारुन त्यांची पूजा केली जाते.

भारतीयांच्या दृष्टीने चित्रपट अभिनेते आणि क्रिकेटर म्हणजे सर्वस्व म्हणूनच त्यांचे लाखो चाहते आपल्या देशात आढळतात. विशेषतः तरुण वर्ग तर चित्रपट अभिनेते आणि क्रिकेटर यांना आपला आयडॉल मानतात. त्यांच्या प्रमाणे दिसायचा, वागायचा, वेशभूषा, केशभूषा करण्याचा प्रयत्न करतात. हे सिलिब्रेटी सांगतील त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न तरुण वर्ग करत असतो त्यामुळे चित्रपट अभिनेते आणि क्रिकेटर यांची जबाबदारी आणखी वाढते. जर तरुण वर्ग आपले अनुकरण करत असतील तर आपली वर्तणूक आदर्शवत असली पाहिजे. आपल्या वर्तणुकीतून किंवा आपण करत जाहिरातीतून तरुणांना चांगला संदेश गेला पाहिजे याची दक्षता या सिलिब्रेटींने घ्यायला हवी मात्र अलीकडे पैशासाठी चित्रपट अभिनेते आणि क्रिकेटर आपली ही जबाबदारी विसरत चालले आहेत.

जो तरुण वर्ग आपल्याला फॉलो करतो, आपल्याला आदर्श मानतो त्यांना आपण पैशासाठी काय करायला लावत आहोत याचेही भान या सिलिब्रेटींना राहिले नाही. आता हेच पहा ना ज्या चित्रपट अभिनेत्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न तरुण वर्ग करतो तेच चित्रपट अभिनेते गुटख्याची जाहिरात करून तरुण मुलांना गुटखा खाण्यास सांगत आहेत. शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार यासारखे हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार गुटख्याची जाहिरात करतात आणि तरुणांना गुटखा खाण्यास सांगतात. अभिनेते पैशासाठी चुकीची जाहिरात तरुण वर्गाला व्यसनाकडे वळवत आहेत तसेच क्रिकेटरही करत आहेत. वास्तविक क्रिकेटर हे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. परदेशात गेल्यावर त्यांना आपल्या देशाचे राजदूत म्हणून ओळखले जाते. तरुण वर्गही क्रिकेट खेळाडूंचे अनुकरण करत असतात. तेच देशाचे राजदूत असलेले क्रिकेट खेळाडू पैशासाठी ऑनलाइन जुगाराची जाहिरात करत आहेत.

ऑनलाइन जुगारामुळे तरुण वर्ग जुगारी तर गुटख्यामुळे व्यसनी होत आहे. आजचा तरुण हा उद्याचा नागरिक आहे. देशाचे भवितव्य तरुणांवर अवलंबून आहे हे माहीत असूनही अशाप्रकारची जाहिरात करून तरुण वर्गाला व्यसनी आणि जुगारी बनवण्याचे काम हे सिलिब्रेटी करत आहेत हा एकप्रकारचा देशद्रोहच आहे. चित्रपट अभिनेते आणि क्रिकेटर पैशासाठी अशाप्रकारचा देशद्रोह करून तरुणांचे आयुष्य उध्वस्त करत असतील तर त्यांना आदर्श का म्हणावे. अजूनही वेळ गेलेली नाही चित्रपट अभिनेते आणि क्रिकेटर यांनी गुटख्याच्या आणि ऑनलाइन जुगाराची जाहिरात करणे थांबवावी. पैशासाठी आपण तरुण पिढीसमोर कोणता आदर्श ठेवत आहोत याचा विचार या सिलिब्रेटींनी करावा. तुम्ही देशातील सन्माननीय नागरिक आहात. देशातील लाखो नव्हे तर करोडो नागरिक तुम्हाला आपला आदर्श मानतात त्याला तडा जाईल असे वागू नका.

देशासाठी आणि देशातील तरुणांप्रति तुमचीही काही जबाबदारी आहे याचे भान ठेवून गुटख्याच्या आणि ऑनलाइन जुगारच्या जाहिराती बंद करा आणि तरुणांपुढे आदर्श निर्माण करा.

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here