भाजप नेत्याचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करणे भोवले ; चौकशी सुरू
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हरीश शर्मा यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करण्याचा नवोपक्रम राबवणारे ठाणेदार उमेश पाटील यांची पोलीस खात्यामार्फत स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते हरीश शर्मा यांचा वाढदिवस चक्क पोलीस ठाण्यात ठाणेदार उमेश पाटील यांच्या कक्षात भाजप कार्यकर्ते व पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ठाणेदार पाटील यांनी शर्मा यांना केक भरवला. उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत शर्मा यांना शुभेच्छा दिल्या. या वाढदिवसाची चित्रफीत समाज माध्यमावर सार्वत्रिक झाली आणि वाढदिवसाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली. समाज माध्यमावर भाजप नेत्यासह पोलीस दलावर टीकेची झोड उठली. याची दखल घेत पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घडल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक साळवे यांनी दिली. चौकशी अहवाल आल्यानंतर ठाणेदार पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बाजावण्यात येईल, तसेच योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.