@शस्त्र सोबत घेऊन निघ @
भिऊ नकोस बेटा
बाहेर निघतांना शस्त्र सोबत घेऊन निघ
बेटा, स्त्री ही अबला नसतेच कधी
तिला इथल्या व्यवस्थेनेच मांजर करुन ठेवलय
अगं, मंदिरांतही सुरक्षित नाहीस तू
मंदिरातील देवासमोर आसिफावर
बलात्कार होत असतांना
कोणता देव तिच्या मदतीसाठी धाऊन आला?
मनिषा सामुहिक बलात्काराची बळी ठरली तेव्हा-
निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी
रस्त्यावर उतरणारे लोक
आता कुठे दडून बसले आहेत?
कुठे आहेत ते-
हैदराबादेतील तरुणीवर बलात्कार करणा-या नराधमांचा एन्काऊंटर करणारे पोलीस?
इथे जात पाहून न्याय होतो
तुला तर जास्तच खबरदारी घ्यावी लागेल बेटा
कारण तू उच्चवर्णीय नाहीस.
हल्ली तर जातीवरही बलात्कार होतो व्यवस्थेकडून.
बेटा,
चौका चौकात, गल्ली बोळात
वखवखलेल्या नजरांचा
तुला नेहमी सामना करावा लागतो हे मला माहित आहे
म्हणूनच म्हणतोय-
बाहेर निघतांना शस्त्र सोबत घेऊन निघ.
कोणता लिंगपिसाट कुठून आणि कसा
हल्ला करेल
काहीच सांगता येत नाही
मात्र तू घाबरायचं नाहीस
कुठलाही विचार न करता
कर त्याच्या सडलेल्या टाळक्यावर प्रहार
तो मेला तरी बेहत्तर!
याद राख
तुझा बाप जीवंत आहे
न्यायालयात टक्कर देण्यासाठी.