मुंबई विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण, विद्यापीठ प्रशासन झोप घेतंय का?

✒ संदीप साळवे ✒
मुंबई प्रतिनिधी
87794 43497
मुंबई:- मुंबई विद्यापीठाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे समोर येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूं यांच्या बंगल्यामागील आणि विद्यापीठाच्या 300 चौरस मीटर क्षेत्रफळावर काही झोपडपट्ट्या मागील काही वर्षांत निर्माण करण्यात आल्या आहेत. जून 2021 मध्ये एसआरए प्राधिकरणाकडे हा पूर्ण परिसर एसआरए प्रकल्प घोषित करण्यासाठी अर्ज करण्यात आला होत्या. दरम्यान ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत हरकत घेण्यास मुदत ही जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली होती. त्याच काळात विद्यापीठ प्रशासनाकडून त्यावर हरकत नोंदविली गेली. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
त्यामुळे विद्यापीठाकडून सदर प्रकल्पाला लीगल नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी दिली. सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सदर प्रकरण गुरुवारी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत उघडकीस आणले. मुंबई विद्यापीठाच्या जागेचा परिसर अशाप्रकारे अतिक्रमणाच्या विळख्यात येत असताना शासनाकडून होणाऱ्या शासकीय संगीत महाविद्यालयासाठी मात्र मुंबई विद्यापीठाकडे जागा नाही यावर सावंत आणि इतर युवासेना सिनेट सदस्यांनी हरकत घेऊन प्रश्न उपस्थित केला.
मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलाला कंपाऊंड वॉल नसल्याने, कोणतीही योजना प्रस्तावित नसलेल्या ओसाड जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न नेहमी ऐरणीवर राहिला आहे. विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधील अडीच एकर जागेवर रियालटी डेव्हलपर्सने आपला बोर्ड लावला असून एसआरएच्या या प्रकल्पाचे अतिक्रमण या जागेवर झाले आहे. प्रकल्पाची जाहिरात आल्यानंतर विद्यापीठाला या अतिक्रमणासंदर्भात जाग आली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून या एसआरए प्रकल्पाला लीगल नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.