सहकारातील सर्वोत्तम प्रवासाचा गौरव
बुलढाणा अर्बन साजरे करणार अमृतमहोत्सवी वर्ष
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विशेष निमंत्रित
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-
सहकार क्षेत्राला नवचैतन्य देणारी देशातील अग्रगण्य पतसंस्था बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम देवकिसन चांडक उर्फ भाईजी यांच्या ७५व्या जन्मवर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत, हे औचित्य साधून संस्थेचे जनरल मॅनेजर कैलास कासट ,आयटी मॅनेजर शेट्टी यांनी अलिबाग येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांची भेट घेऊन बँकेला निमंत्रित करताना संस्थेच्या चार दशकांच्या यशस्वी वाटचालीचा आणि सहकारातून घडवलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या उत्सवाची माहिती दिली.
१९८६ साली ‘जनतेच्या पैशातून जनतेचे भले’ या तत्त्वावर उभारलेली बुलढाणा अर्बन आज भारतातील सर्वात मोठी सहकारी पतसंस्था म्हणून ओळखली जाते. संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या दूरदृष्टीतून आणि विद्यमान अध्यक्ष डॉ. सुकॆश जमवार यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक क्षेत्रात क्रांतिकारक प्रगती साधली आहे आणि विशेष म्हणजे संस्थात्मक उभारणी आणि संस्था हीच आपली ओळख हे आपल्या कामगिरीने देशाला पटवून देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
बुलढाणा अर्बनची कार्ययात्रा
गेल्या चार दशकांत बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेडने सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करताना आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक जबाबदारीचा सुंदर संगम साधला आहे. आज संस्थेकडे १७ लाख सभासद, ४७६ शाखा, ७,००० पेक्षा अधिक कर्मचारी असून तब्बल ₹२५,००० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय संस्थेने मार्च २०२५ अखेर पूर्ण केला आहे. ज्यामध्ये १५,००० कोटींपेक्षा अधिकच्या ठेवी तर सोनेतारण कर्ज पोर्टफोलिओ ४००० कोटी रुपयांहून अधिक, वेअरहाऊस लोन १,६०० कोटी रुपये, तसेच इतर कर्ज योजनासह कर्जाचा विस्तार १०,००० कोटी रुपयांपर्यंत विस्तारला आहे. संस्थेचे महाराष्ट्रसह मध्यप्रदेश,कर्नाटक आणि तेलंगणामध्ये देखील जाळे पसरले आहे. औद्योगिक शेती प्रकल्प आणि लघुउद्योजकांना भांडवल सहाय्य देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी संस्थेने तब्बल ४३१ गोडावून उभारले आहेत. .
राज्यातील अनेक पतसंस्था सुद्धा इथे विश्वासाने ठेवी ठेवत आहेत हे सुद्धा एक विशेषच आहे शिवाय अनेक पतसंस्थाना अडचणीच्यावेळी सहकारातून हात देण्याचे आणि सहकार्य करण्याची भावना बुलढाणा अर्बन संस्थेला इतरांपेक्षा वेगळी ओळख देत आहे.
आधुनिक बँकिंग आणि नवोन्मेष ((Innovation)
संस्थेने कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-वॉलेट, इंटरनेट बँकिंग, व्हर्च्युअल कार्ड, आरटीजीएस-एनईएफटी, गोल्ड टेस्टिंग मशीन, व्हिडिओ सर्व्हेलन्स आणि ऑटोमेटेड वेअरहाऊस स्टॅकर्स यांसारख्या अत्याधुनिक सेवा सुरू केल्या आहेत. संस्थेचा अभिनव उपक्रम ‘बुलढाणा अर्बन बिझनेस नेटवर्क’ (www.bubn.in) हे स्वदेशी ई-कॉमर्स व्यासपीठ आहे, जिथे लाखो सभासद एकमेकांशी व्यावसायिकरीत्या जोडले गेले आहेत. ‘सोशल बँकिंग’ या अनोख्या संकल्पनेतून संस्थेने आर्थिक उपक्रमांसह आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, वृद्ध कल्याण आणि डिजिटल साक्षरता या सामाजिक क्षेत्रांमध्येही मोठे कार्य केले आहे. ९७–९८ टक्के वसुली दरासह बुलढाणा अर्बनने पारदर्शक, जबाबदार आणि जनाभिमुख बँकिंगचा आदर्श निर्माण केला आहे.
रायगड बँकेचे सन्मानपूर्वक आमंत्रण
या अमृतमहोत्सवी सोहळ्यास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही विशेष निमंत्रित म्हणून सन्मानपूर्वक आमंत्रण देण्यात आले. बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रातील सुशासन, शून्य निव्वळ एनपीए, सातत्यपूर्ण नफा, आणि तांत्रिक प्रगतीमुळे रायगड बँकेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सहकारातील सर्वोत्तम पद्धतींच्या आदानप्रदानासाठी आणि सहकार्याच्या भावनेतून बुलढाणा अर्बनने रायगड बँकेला सन्माननीय पाहुणा म्हणून निमंत्रित केले.तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांना महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनचा महाराष्ट्रातील बेस्ट सीईओ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले.