शेतातील पडक्या खोलीत आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह.

खंडाळा शिवारात असलेल्या निर्जन शेतातील पडक्या खोलीत अंदाजे 25ते 35 वयाच्या महिलेचा मृतदेह बुधवारी कन्हान पोलिसांना आढळून आला. मृतदेह कुजलेला असून संशयास्पद अवस्थेत होता.

नागपूर प्रतिनिधी

नागपूर:- खंडाळा शिवारात असलेल्या निर्जन शेतातील पडक्या खोलीत अंदाजे 25ते 35 वयाच्या महिलेचा मृतदेह बुधवारी कन्हान पोलिसांना आढळून आला. मृतदेह कुजलेला असून संशयास्पद अवस्थेत होता. शेतमालकाला शेतातील पडक्या खोलीमधून दुर्गंध येत असल्याची सूचना मिळाली होती. ते शेतात पाहणी करायला गेले असता खोलीत झाकलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ कन्हान पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी मृतदेहाची ओळख पटलेली नसून हरवल्याच्या तक्रारीचा शोध घेणे पोलिसांनी सुरू केले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हान पोलिस स्टेशन हद्दीअंतर्गत फिर्यादी महेश ज्ञानेश्वर खवले यांची खंडाळा शिवारात पडीत शेत जमीन आहे. पडीत व निर्जन अशा शेतात पडक्या स्वरुपाची खोली आहे. जिथे त्यांनी काही काळ ढाबा सुरू केला होता. बाजूलाच त्यांचा मित्र निखिल ढोबळे यांची पानटपरी होती. ढाबा व्यवसायाला चालना नसल्याने ढाबा आणि पानटपरी दोन्ही बंद केली होती. त्यामुळे सदर शेत सध्या स्थितीत निर्जन अवस्थेत रिकाम पडलेले होत.

अशात त्यांच्या शेतात असलेल्या खोलीतून दुर्गंध येत असल्याची माहिती खवले यांना बुधवारी सकाळी मित्राने फोनवरून दिली. त्यांनी शेतात जाऊन बघितले असता खोलीत मृतदेह चादरीने झाकून ठेवलेला असल्याचे आढळले. त्यांनी तात्काळ कन्हान पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला.

मृतदेह अंदाजे 25 ते 35 वयातील महिलेचा आहे. मृतदेह नग्न अवस्थेत असून, पूर्णतः कुजलेला होत. प्राथमिक अंदाजात पोलिसांनी घातपात असल्याचा अंदाज वर्तवित वरिष्ठांना सूचना दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणेकर, मुख्तार बागवान यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व दिशेने तपासाची सूत्रे हलविण्याचे आदेश दिले. मृतदेहाला मेडिकल येथे हलविले असून, पुढील तपास सुरू आहे.

शेतात आढळलेला महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत असून, चेहराही ओळ्खण्यासारखा नाही. मृतदेह आढळलेल्या खोलीत पांढऱ्या रंगाची लैगीन, गुलाबी रंगाचा दुपट्टा, लेडीज चप्पल सोबत एक पुरुषाचा नाईट पेंट पोलिसांना सापडला आहे. मात्र, जीवघेणे शस्त्र कुठेही आढळले नाही. लगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान नदी पुलालाखाली कामठी हद्दीतही महिलेचा कुजलेला मृतदेह आढळलेला होता. याच महामार्गावर कामठी पोलिस हद्दीत लॉज संचालकाची हत्या करून मृतदेह जाळण्यात आला होता. हा महामार्ग सध्या अतिसंवेदनशील महामार्ग म्हणून गणला जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here