Home latest News श्रीवर्धन तहसीलदार कार्यालय परिसरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न — नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
श्रीवर्धन तहसीलदार कार्यालय परिसरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न — नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123
श्रीवर्धन तहसीलदार कार्यालय परिसरात सध्या स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कार्यालय परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
सार्वजनिक स्वच्छता गृहांची स्थिती अत्यंत दयनीय असून पाण्याची अपुरी सोय आणि नियमित साफसफाईचा अभाव यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. दिवसभर विविध शासकीय कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आणि विशेषतः महिलांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महिलांसाठी असलेले सार्वजनिक स्वच्छता गृह अनेक दिवसांपासून बंद असल्याने त्यांच्या गैरसोयींमध्ये भर पडली आहे. उलट महिला कर्मचाऱ्यांसाठी राखीव स्वच्छता गृह स्वच्छ आणि वापरात असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
याशिवाय कार्यालय परिसरात कचऱ्याचे ढीग, धुळीने व्यापलेले रस्ते आणि देखरेखीचा पूर्ण अभाव हे चित्र परिस्थिती अधिकच गंभीर बनवत आहे. नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर तातडीने सुधारणा करण्यात आल्या नाहीत, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.
स्थानिकांच्या मते, “शासनाच्या स्वच्छ भारत मोहिमेला तडा जाणारा हा प्रकार असून तहसीलदार कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अशी परिस्थिती असणे ही प्रशासनासाठी लज्जास्पद बाब आहे.”
नागरिकांनी मागणी केली आहे की, त्वरित स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात यावा आणि सर्वांसाठी समान सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.