Home latest News तुर्भे एमआयडीसीत खुनाच्या प्रकरणात* *माजी नगरसेवकासह साथीदाराला अटक*
*तुर्भे एमआयडीसीत खुनाच्या प्रकरणात*
*माजी नगरसेवकासह साथीदाराला अटक*
*अरुणकुमार करंदीकर*
*पनवेल शहर प्रतिनिधी*
*मो.क्र. 7715918136*
पनवेल : तुर्भे एमआयडीसी परिसरात तुर्भे स्टोअर येथील नवजीवन हिंदी हायस्कूल जवळ सार्वजनिक शौचालयाच्या समोर एक इसम भररस्त्यात बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती काल दुपारी पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली , तेव्हा तिथे एक मृतदेह आढळला. सदर मृत इसमाला सकाळी सात वाजताच्या दरम्यान सार्वजनिक शौचालयाच्या गच्चीवर दोन जणांनी बेदम व जबर मारहाण करून क्रूर हत्या केली असल्याची माहिती मिळाली.
सदर प्रकरणी अधिक चौकशी केली असता मयत इसम बिगारी काम करत होता. त्याचे नाव सुधाकर शेषराव पाटोळे ( वय 34 वर्षे ) असे असुन तो स्थानिक रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे . सदर प्रकरणाबाबत परिसरातील प्रत्यक्षदर्शी व मृत इसमाच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता आरोपी अर्जुन विठ्ठल अडांगळे ( वय 52 वर्षे ) व दुसरा आरोपी विधान मंडला ( वय 48 वर्षे ) ह्या दोघांनी सुधाकर पाटोळे याच्यावर मोबाईल फोन चोरल्याचा संशय घेतला होता. त्या कारणावरून दोन्ही आरोपींनी सुधाकर पाटोळे याला सार्वजनिक शौचालयाच्या गच्चीवर नेऊन बेदम मारहाण करुन त्याचा मृतदेह शौचालयासमोर भररस्त्यात फेकुन टाकला. आरोपी अर्जुन अडांगळे हा त्या विभागाचा माजी नगरसेवक असुन दुसरा आरोपी विधान मंडला हा सार्वजनिक शौचालयाच्या चालक आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी माजी नगरसेवक अर्जुन अडांगळे याच्यासह त्याचा साथीदार विधान मंडला यांना तुर्भे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुधाकर पाटोळे ह्या बिगारी काम करणाऱ्या गोरगरीब मजुराला मोबाईल चोरी केल्याच्या संशयित कारणावरून बेदम जबरी मारहाण केल्याने हकनाक जीव गमवावा लागला असल्यामुळे परिसरात ह्याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माजी नगरसेवक असलेल्या आरोपी अर्जुन अडांगळे याची ह्या ठिकाणी जबरदस्त दहशत असल्याचे समजते आहे. ह्या प्रकरणात साक्षीदार असलेल्या नागरिकांना काहीही दगा फटका होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज व सीडीआर लोकेशन तपासण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. राजकीय व्यक्तीकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिक भयभीत झाले असल्याची चर्चा स्थानिकात आहे.
नवजीवन शाळेमध्ये अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग , कर्मचारी व नागरिकांची क्रूर हत्या झालेल्या सार्वजनिक शौचालयाच्या मार्गाने वर्दळ असुन लोकांचा तिथे राबता आहे. सदर हत्येमुळे परिसरातील वातावरण भयभीत झाले असून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून त्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.