विशाखापट्टणम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमधून 90 किलो गांजा जप्त,सहा आरोपींना अटक.

नागपूर:- रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रेल्वेगाडी क्रमांक 02805 विशाखापट्टणम-निजामुद्दीन एसी स्पेशल रेल्वेगाडीतून 11 किलो पाकिटात ठेवलेला 9 लाख रुपये किमतीचा 89.5 किलो गांजा जप्त करून सहा आरोपींना अटक केली आहे.

राजेंद्र मंडल 21 रा. ओडिसा, संजीव कुमार सिंह 26 रा. सिवान, हरपाल सिंह 44 रा. गौतम बुद्धनगर, कंचन कुमार राय 20 रा. सहारन बिहार, करीम मोहम्मद कुरेशी 22 रा. गोरखपूर आणि सद्दाम अलाउद्दीन हुसैन 21 रा. सिकरी अशी आरोपींची नावे आहेत. आरपीएफकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर आरपीएफ ठाण्याचे निरीक्षक एन. पी. सिंह यांच्या आदेशानुसार प्रवीण कुमार गुर्जर आणि कृष्ण कुमार मीना विशाखापट्टणम-निजामुद्दीन एसी स्पेशल रेल्वेगाडीत नागपूर पर्यंत गस्त घालत होते. दरम्यान त्यांची नजर एसी कोचमध्ये प्रवास करीत असलेल्या राजेंद्र मंडल आणि संजीव कुमार सिंह, हरपाल सिंह आणि कंचन कुमार राय यांच्या सामानावर गेली. सर्वांकडे असलेल्या बॅगमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्याचे दिसत होते. संशय आल्यामुळे त्यांच्या बॅगची तपासणी केली असता त्यात गांजा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांची चौकशी केली असता एस 6 कोचमधील करीम आणि सद्दामजवळही गांजा असल्याचे समजले. सर्वजण विशाखापट्टणमवरून निजामुद्दीनला जात होते. दरम्यान रेल्वेगाडी बुटीबोरीवरून निघाली होती. आरपीएफ जवान गुर्जर आणि मीना यांच्यासाठी सहा आरोपींना सांभाळणे कठीण होते. आरोपी धावत्या गाडीतून उडी मारण्याची शक्यता होती. अशा स्थितीत त्यांनी आरपीएफ नागपूर कंट्रोल रुमला मदत मागितली. ही गाडी नागपूरला पोहोचताच आरपीएफचे निरीक्षक आर. एल. मीना यांनी विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना रेल्वेतून खाली उतरविले. कागदोपत्री कारवाईनंतर आरोपी आणि जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here