भावी वधूला भेटायला शेतात बोलावले; कुऱ्हाडीने वार करत केली हत्या.

नागौर:- कोणतेही नातेसंबंध जोडताना परस्पर विश्वास असणे गरजेचे असते. लग्नबंधनात विश्वास आणि प्रेम असावे लागते. मात्र, या नात्यात संशय आला की नाते तुटायला वेळ लागत नाही. तसेच संशयाचे भूत मानेवर बसले की, साध्या साध्या गोष्टींचाही संशय येतो. संशयामुळे माणूस कोणत्याही थराला जातो. संशयामुळे एका तरुणाने वाग्दत्त वधूची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानातील नागौर जिल्ह्यात घडली आहे.

तरुणाने आपल्या भावी वधूला भेटण्यासाठी शेतात बोलावले. ती शेतात आल्यावर त्याने तिच्या मानेवर आणि पाठीवर कुऱ्हाडीने वार करत तिची क्रूर हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेतातील खड्डात पुरून त्यावर माती टाकली. या घटनेनंतर तरुण फरार झाला होता. शेतात काम करणाऱ्यांना मातीखाली मृतदेह पुरल्याचे आढळल्यावर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि ओळख पटवण्यास सुरुवात केली. पुरलेला मृतदेह शेडोखेन गावातील तरुणीचा असल्याचे पोलिसांना समजले. तिचे गावातील सुखवीर नावाच्या तरुणाशी लग्न ठरले होते. त्यांचा साखपुडाही झाला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबीयांना बोलावत मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले. आरोपीला अटक केल्यावरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली. पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबीयांना समजावले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांनी तरुणीवर अंतिम संस्कार केले.

या तरुणीचे गावातील सुखवीरशी लग्न ठरले होते. त्यांच्या साखरपुडाही झाला होता. मात्र, सुखवीरचा स्वभाव संशयी होता. तो विनाकारण भावी वधूवर संशय घेत होता. तिचे दुसऱ्या तरुणाशी संबंध असावे, असा त्याला संशय होता. तसेच तो विनाकारण नाराज राहत होता. भावी वधूवर संशय असल्याने त्याने तिला भेटण्यासाठी शेतात बोलावले होते.

सुखवीरने भेटण्यासाठी बोलावल्याने त्याला लग्नाबाबत काही बोलायचे असेल असे समजून तरुणी त्याला भेटायला शेतात गेली होती. ती शेतात आल्यावर सुखवीरने कुऱ्हाडीने तिच्या मानेवर आणि पाठीवर वार करत तिची क्रूर हत्या केली. त्यानंतर मृतदेह पुरून तो फरार झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून सुखवीरला अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याने भावी वधूची हत्या केल्याचे कबूल केले आहे. त्याच्या तपासातून अधिक गोष्टी उघड होतील, असे पोलिसांनी सांगितले. त्याने ही हत्या नेमकी कोणत्या कारणाने केली याचा तपास करण्यात येत असल्याचे नागौरच्या पोलीस अधीक्षक श्वेता धनकड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here