परभणीत एकाच वेळी 900 कोंबड्यांचा मृत्यू, बर्ड फ्लूच्या भीतीचं सावट.

देशभरात सध्या कोरोनाच थैमान सुरु असताना, आता बर्ड फ्लूने देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.

परभणी:- देशभरात सध्या कोरोनाच थैमान सुरु असताना, आता बर्ड फ्लूने देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झालेली असली, तरी महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्लूचा कोणताही प्रकार आढळलेला नव्हता. मात्र, परभणीतील मुरुंबा गावात गेल्या दोन दिवसापासून कोंबड्यांचा अचानक मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे गावात एकाच खळबळ उडाली आहे.

परभणीच्या मुरुंबा गावात एका दिवसांत तब्बल 900 कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या आहेत. कोंबड्या अचानक मेल्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला गेलाय.

अहवालाची प्रतिक्षा

दरम्यान गावातील मृत कोंबड्यांचे सँम्पल्स पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. तसेच, अहवाल आल्यावरच पुढील खुलासा होईल आणि नेमके कारण समोर येईल, असे जिल्हा पशु वैद्यकिय डॉ.अशोक लोणे यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे.

‘या’ राज्यांमध्ये बर्ड फ्लूची परिस्थिती

आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीला ‘बर्ड फ्लू’ झाला नाही, असा दावा सरकारने केला आहे. परंतु, ज्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूची खात्री झाली आहे, तेथील सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. या राज्यांमध्ये राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांचा समावेश आहे. काही अहवालानुसार केरळमध्ये सुमारे 12,000 बदकांचा मृत्यू झाला आहे. तर, हिमाचलमध्येही सुमारे दोन हजार स्थलांतरित पक्षी मरण पावले. राजस्थानच्या विविध जिल्ह्यात 250पेक्षा जास्त कावळ्यांचा जीव गेला. हरियाणाच्या पंचकुला येथे जवळपास चार लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्येही बर्ड फ्लूने दरवाजा ठोठावला आहे. तर, केरळमध्ये बर्ड फ्लूला ‘राज्य आपत्ती’ घोषित करण्यात आले आहे. काही राज्यांमध्ये या संदर्भात इशारे देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here