अहमदनगर बालविवाह रोखण्यात मिळाले यश.

अहमदनगर:- जिल्ह्यात मंडळी लग्नासाठी आनंदाने जमली होती, पण ते झालेच नाही. मात्र, या लग्नासाठी तयार केलेले अन्न व मेजवानी वाया जाऊ नये म्हणून वधु-वराकडील मंडळींनी उपस्थितांना किमान जेऊन जाण्याची विनंती केली. आणि आलेले वऱ्हाड लग्न न लावता, पण पंगतीत जेवून मार्गस्थ झाले. पोलिस व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी रोखलेल्या बालविवाहात ही घटना घडली.

दोन्हीकडचे वऱ्हाडी जमले होते. नवरा-नवरीही सजूनधजून तयार झाले होते. शुभमंगल सावधान होण्याची वेळही जवळ येत होती. पण, अचानक पोलिस व चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते मांडवात आले. नियोजित वधू कायदेशीरदृष्ट्या सज्ञान नसल्याने तिचा विवाह करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुलगी अल्पवयीन असल्याची घोषणा करीत लग्न थांबविण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. नगर तालुक्यातील चास ग्रामपंचायत हद्दीतील हेमराज मंगल कार्यालयात गुरुवारी ही घटना घडली. दुपारी 12 वाजता लग्न होणार होते. चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री हेल्पलाइनला हा बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. या विवाहाबाबत नगर तालुका पोलिसांना त्वरित लेखी तक्रार देण्यात आली असल्याने लग्न लागणार तेवढ्यात पोलिसांसह इतर अधिकारी लग्नस्थळी पोहोचले. अचानक पोलिस आल्याने वधू-वरांकडील मंडळींनी काहीसा गोंधळ घातला. वधूचा जन्माचा दाखला सादर करण्याबाबत पोलीस प्रशासनाने वधूपित्याला विनंती केली, परंतु वधू अल्पवयीनच असल्याने वऱ्हाडी मंडळींनी राजकीय दबाव आणून पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. भर सभामंडपात वधूकडील महिलांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करीत रडारडीचा कार्यक्रम सुरू केला. पण त्याचा काहीही परिणाम पोलिस व प्रशासनावर झाला नाही. त्यांनी वधू आणि वर पक्षाकडील मंडळींची समजूत काढली. लग्न थांबविले नाही तर बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अन्वये कारवाई करून सर्व उपस्थित वऱ्हाडी मंडळी, मंगल कार्यालय मालक, केटरर्स, लग्न लावणारा पुरोहित, व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफर अशा सर्वच लोकांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. मुलगी १७ वर्षांचीच असल्याने तिचे लग्न करता येणार नाही, याची माहिती देण्यात आली. अखेर लग्न थांबविण्यात आले. मुलगी आपल्या पालकांसह घरी गेली. नवरदेवासह वरातीतील मंडळी आल्यापावली परतली. नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथकाने तत्पर ही कारवाई करून प्रतिष्ठित नागरिकांच्या कुटुंबातील हा बालविवाह थांबविला.

पालकांकडून घेतले हमीपत्र
नगर तालुका पोलीस स्टेशनने वधू अल्पवयीन असल्याने संपूर्ण कागदपत्रासह बालिकेस व वधू-वराचे आई-वडील, गावातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मंगल कार्यालयचे मालक यांच्यासह संबंधितांना पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. मुलगी बारावीत शिकत असून तिचे वय केवळ 17 वर्षे आहे. जोपर्यंत 18 वर्षे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत विवाह करणार नाही, जर वधू ही वराच्या कुटुंबात नांदताना आढळली तर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 अन्वये संबंधित सर्व लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे हमीपत्र वधूच्या पालकांकडून लिहून घेण्यात आले. अल्पवयीन मुलीसोबत लग्न कराल तर कारवाई केली जाईल, असा इशारा वर-वधू पक्षांना बाल कल्याण समितीने दिला. मुलीच्या मनावर परिणाम होऊ नये, यासाठी तिचे समुपदेशन करण्यात आले. तसेच 18 वर्षापर्यंत पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड लाईन संबंधित बालिकेची माहिती गोळा करून बालकल्याण समितीला अवगत करत राहील. या काळात बालिकेचे शिक्षण कुठेही थांबणार नाही याची विशेष दक्षता संबंधित सर्व बाल यंत्रणा घेतील, असा आदेशही बालकल्याण समितीने दिला. “उडान” बालविवाह प्रतिबंध अभियानांतर्गत बालविवाह रोखण्यासाठी बालकल्याण समिती अध्यक्ष हनीफ शेख, सदस्य प्रवीण मुत्याल, ज्योत्स्ना कदम, बाल संरक्षण कक्ष प्रमुख सर्जेराव शिरसाट, चाईल्ड लाईन टीम मेंबर शुभांगी माने, प्रवीण कदम यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here