मी मणिपूर बोलतोय…

82

मी मणिपूर बोलतोय…

मनोज कांबळे: आमच्याकडे समुद्रकिनारा नाही. किंवा मोठ्या राजकारण्यांनी, ऍक्टर्स, सोशल मीडिया स्टार, क्रिकेट प्लेयर्सनी मणिपूरात हल्ली फिरायला आलेल्याचे फोटोही टाकलेले नाहीत. मग मणिपूरात नक्की काय आहे ? किंवा महत्त्वाचा प्रश्न, काय शिल्लक राहिले आहे? 

आमच्याकडे आहे लोकटक सरोवर. जे पाण्यावर तरंगणारी बेट असलेले जगातील एकमेव तलाव आहे. १ लाख लोक या तलावाच्या सानिध्यात राहतात. इथल्या बेटांवर २३३ जातींचे वृक्ष, पक्ष्यांच्या १०० हून अधिक तर प्राण्यांच्या ४२५ हून अधिक दुर्मिळ प्रजाती आढळून येतात. 

तलाव परिसरातील किबुल लामिआयो नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ हरणांचा निवास असतो, त्यांना मणिपुरी भाषेत आम्ही संगई म्हणतो. पर्यटनावर स्थानिकांचा रोजगार चालायचा. इथल्या ‘फुमडीं’ बेटांवरील रिसॉर्ट्समध्ये पिकनिकसाठी देशभरातून हजारो पर्यटक यायचे. हल्ली नाही येत. का कुणास ठाऊक?

थरोन गुहा तर निसर्गातील चमत्कारच आहे. हजारो वर्षे प्राचीन मनुष्यजातीचे या रहस्यमयी गुहेमध्ये वास्तव्य असल्याचे पुरावे सापडले आहेत. बाजूलाच सुंदर धबधबा आहे. इथे काढलेल्या फोटोंवर तुम्हाला भरपूर लाईक्स, कंमेंट मिळतील? पण त्यासाठी तुम्हाला इथे यावे लागेल? का येत नाही तुम्ही?

Image

आमच्याकडे खास महिला व्यावसायिकांकडून चालवलं जाणार ५०० वर्षे जुन इमा मार्केट आहे. इथे आमच्या माता-भगिनी स्थानिक फळे, भाज्या, मसाल्यांपासून स्वतःच्या हाताने बनवलेले कपडे, हस्तकला, विकर उत्पादने विकतात. फक्त महिलांकडून चालवलं जाणार हे मार्केट, जगातील कदाचित एकमेव असावं. 

Image

भारताच्या शहिद सैनिकांना सलाम करणारे हुतात्मा स्मारक देखील इंफाळमधील मोइरांग येथे आहे. नऊ डोंगरांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मणिपूरमध्ये पर्यटकांसाठी सर्वकाही उपलब्ध असतानासुद्धा गेल्या वर्षभरात माझा पर्यटन व्यवसाय तब्बल ९०% कमी का झाला? सांगाल का?

माहितीसाठी गूगलवर मी सर्च केलं, काही बातम्या दिसल्या. 

…गेल्या मे महिन्यापासून १९६ मणिपुरी नागरिकांची हत्या, ५० हजार लोकांची घरे करण्यात आली जाळून राख, मणिपुरी महिलांवर सामूहिक बलात्कार, पुरुषांच्या झुंडीकडून मुलींची काढण्यात आली निर्वस्त्र धिंड, ५ हजाराहून जास्त पोलीस बंदुकांची, लाखो गोळ्यांची पोलीस स्टेशनमधून चोरी, ३८६ धार्मिक स्थळ जाळून नष्ट, भारतीय सैनिकाची निर्घृण हत्या…आणि अशाच काही बातम्या

पण शेवटी या बातम्याच. घडलेली घटना बातमी आणि प्रकाशित होण्यात कित्येक दिवसांचा फरक. खऱ्या कि खोट्या कशा कळणार?

म्हणून म्हटलं ‘मोठी माणसं’ माझ्याबद्दल काय म्हणाली ते बघू. तीच माणसे ज्यांना भारतीय नागरिक म्हणून तुम्ही निवडून दिले आहे. ज्यांचे चित्रपट, गाणी तुम्ही करोडोच्या संख्येने बघता. ते खेळताना जीवाच्या आकांताने ओरडून चीअर करता. जी माणसे भारतीयांचा आवाज म्हणून जगभर मिरवतात. पण अशा मोठ्या माणसांच्या तोंडी माझं नावच ऐकायला मिळालं नाही. ना #SaveManipur ची पोस्ट होती, ना ‘मणिपूर फिरायला जाऊ’ असे कुणी आवाहन करत होता. मीसुद्धा भारतातच आहे, हे ‘मोठी माणसं’ विसरले तर नसतील ना?

बाकी देववाणी झाल्यासारखी एकमेकांचे ‘खास’ पोस्ट कॉपी करून ‘खास हॅशटॅगसह’ ट्विटर, इंस्टाग्रामवर पोस्ट, रिपोस्ट, शेअर करणाऱ्या या ‘मोठ्या माणसांच्या’ पोस्टमधून ‘मणिपूर’ हा शब्दच गायब झाला होता. खरंच मी गायब झालो होतो का? 

खरं म्हणजे वर्षभरात गायब होण्याइतकं मणीपूर शुल्लक नाही. आमची स्वतंत्र संस्कृती आहे. सुदंर संगीत, रुचकर खाद्यसंस्कृती आहे. निसर्गाने भरभरून दिलंय. २९ बोलीभाषा बोलणारी ३२ लाख हाडामांसाची ‘भारतीय’ माणसं इथे आहेत. कधीतरी त्यांना भेटायला इथे यालच? तेंव्हा एक गोष्ट मात्र करा..

जाडजूड कपडे घालून या, म्हणजे इथल्या पेटत्या घरांच्या, चर्च, मंदिरांच्या आगींचे चटके तुम्हाला लागणार नाहीत. भेदरलेली लहान मुले दिसतील, तरुण मूल गमावलेले निराश आई-वडील दिसतील, घाबरलेल्या तरुणी दिसतील. तुमच्या Vlog साठी त्यांचे व्हिडीओ काढायला विसरू नका. आणि हो…

त्या विडिओसोबत एखाद Sad म्युझिक एडिट करायला विसरू नका. लोकांना Tragedy बघायला आवडते असं म्हणतात. म्हणून तेवढाच तुमचा Vlog जास्त लोक बघतील, लाईक, शेअर वाढतील. एंगेजमेंट रेट वाढेल. अनॅलिटिकस महत्त्वाचे. यावेळी एका गोष्टीची मात्र खबरदारी घ्या…

वाटेवर एखादा सर्वसामान्य मणिपुरी नागरिक तुम्हाला नक्की विचारेल, इतके दिवस कुठे होता ? त्याच्या या प्रश्नाचे उत्तर मात्र तयार ठेवा.

                                                                                                                      – मणिपूर

–