मालदीव आणीबाणी: दोन भारतीय पत्रकारांना अटक

51

नवी दिल्ली : राजकीय संकटात सापडलेल्या मालदीवमध्ये दोन भारतीय पत्रकारांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. मणी शर्मा आणि आतिश रावजी पटेल अशी या दोघांची नावे आहेत. हे दोन्ही पत्रकार प्रसिद्ध वृत्तसंस्था एफसीचे प्रतिनिधी आहेत.

याबाबत एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मणी शर्मा हा अमृतरसरचा, तर भारतीय वंशाचा आतिश पटेल हा लंडनचा रहिवासी आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मालदीवमधील खासदार अली जहीर यांनी सांगितले की, आता येथे वृत्तपत्र स्वातंत्र्य शिल्लक राहिलेले नाही. काल एका वृत्तवाहिनीवरही बंदी घालण्यात आली. अटक करण्यात आलेल्या पत्रकारांची तत्काळ सुटका करावी आणि देशात पुन्हा लोकशाही स्थापित करावी अशी आमची मागणी आहे. मालदीव हा देश राजकीय संकटात सापडला असून राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लागू केली आहे. मालदीव सुप्रीम कोर्टाने विरोधी पक्षांच्या ९ नेत्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रपती यामीन यांच्या सरकारने हा आदेश मानला नाही. त्यानंतर राष्ट्रपतींनी देशात आणीबाणीची घोषणा केली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश अब्दुल्ला सईद आणि आणखी एक न्यायाधीश अली हमीद यांना अटक करण्यात आली.