महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; लीलावती रुग्णालयात दाखल

54

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या सिनेमाचे शूटिंग गोरेगावच्या फिल्मसिटीत सुरु होते. ते उशिरापर्यंत चालले. त्याचा थोडा त्रास जाणवत असल्याने आवश्यक त्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना लीलावतीत दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून कळते. मात्र, अद्याप त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि बच्चन कुटुंबियांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

अमिताभ बच्चन यांना २०१२ मध्ये देखील शस्त्रक्रियेकरीता १२ दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बच्चन यांना यकृतासंबंधीचा त्रास आहे. त्याचबरोबर २००५ मध्ये देखील त्यांच्यावर पोटात प्रचंड दुखत असल्याने आतड्यांसंबंधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या समस्येवर योग्यवेळी उपचार घेण्यात आले नाहीत. तर ते घातक ठरु शकते असे त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले होते. या आजारमध्ये छोटे आणि मोठे आतडे कमजोर होत जातात. त्यामुळे आतड्यांवर सूज येते. त्यामुळे बच्चन यांना शस्त्रक्रिया यासाठी करावी लागली होती. त्यासाठी त्यांना दोन महिने रुग्णालयात रहावे लागले होते.