उत्तम गल्वा स्टील प्लॅन्टमधील ब्लास्ट, 8 जखमींना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलविले.
आशीष अंबादे प्रतिनिधी
वर्धा:- नजिकच्या भुगाव येथील उत्तम गल्वा स्टील प्लॅन्टमधील ब्लास्ट फरनेस काल 2 रोजी सायंकाळी वार्षिक देखभालीसाठी बंद करण्यात आला होता. फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेस मधील राख बाहेर काढण्यासाठी 50 कामगार काम करीत होते. फरनेस मधील राख काढत असताना आज 3 रोजी सकाळी 10.10 वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याने 38 जण भाजल्या गेले. यातील 28 जणांना सावंगी मेघे येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे तर 10 व्यक्तींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिगंभीर 6 जनांना नागपूर येथील ऑरेंजसिटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने यात कुणाचाही मृत्यू झाला नाही.
जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात भरती रुग्णांची विचारपूस करून रुग्णांच्या नातेवाईकांना धीर दिला. रुग्णांना योग्य आणि चांगले उपचार मिळतील याची हमी जिल्हाधिकारी भीमनवार यांनी दिली. गरज पडल्यास रुग्णांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात विशेष वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्यात येईल असेही त्यांनी नातेवाईकाना सांगितले. दरम्यान, दुपारी गंभीर जखमी असलेले मनोजकुमार यादव 40, सूरज बोयना 28, इंद्रजित राम 38, अभिषेक भौमिक 32, शाम किशोर पाल 32, विनोद पांडे 55 या 6 जणांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे अशी माहिती उत्तम गलवाचे जनसंपर्क अधिकारी आ. के. शर्मा यांनी दिली.
अपघातास जबाबदार असलेल्यांवर कारवाई : पालकमंत्री केदार
उत्तम गाल्वा मेटॅलिक्स या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 38 कामगार जखमी झाले. अपघातात जखमी कामगारांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील यांनी दिले. तसेच सदर अपघाताची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कारखाने अधिनियम 1948च्या तरतूदीनुसार, सरकारी कामगार अधिकार्यांमार्फत वेतन प्रदान नियम व कामगार विमा नियमाच्या अनुषंगाने आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्फत तपासणी करुन अपघातास जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत