युद्ध, पूजापाठामध्ये वापरापासून सुरुवात झालेल्या चॉकलेटचा आजवरचा प्रवास फारच मनोरंजक आहे
मनोज कांबळे
मुंबई: तुम्हाला माहित आहे का आपल्या सर्वांच्या आवडीच्या चॉकलेटला तब्बल ४००० वर्षांचा इतिहास आहे. मेसोमेरीकन्स म्हणजे सध्याच्या अमेरिकेच्या दक्षिणेकडील मेक्सिको देशात राहणाऱ्या लोकांनी सर्वात प्रथम कोकोच्या झाडांची लागवड केली. कोकोच्या बियांना भाजून त्याची पेस्ट केली जायची आणि त्यात मध, पाणी घालून त्याचे पेय बनवले जायचे. हे पेय त्याकाळी पूजापाठाच्या प्रसंगी आणि आजारपणात प्राशन केले जायचे.
पुढे मायन संस्कृतीतील लोकांनी तर चॉकलेटला देवाचे पेय म्हणून मान्यता दिली होती. चॉकलेट खाल्यानंतर ऊर्जा मिळत असल्याने त्याकाळी मायन लोक युद्धाला जाण्याआधी कोको झाडाची पूजा करून चॉकलेटचे पेय पीअत असत.
१५ व्या शतकात सध्याच्या मध्य मेक्सिको मध्ये उदयास आलेल्या अझटेक संस्कृतीमध्ये कोकोच्या बियांचा वापर चक्क नाण्यांच्या स्वरूपात केला जात असे. ४ कोको बियांच्या बदल्यात शिजवून खाण्यासाठी एका सश्याचे मटण मिळत असल्याचे उल्लेख त्याकाळच्या साहित्यात सापडतात.
चॉकलेटसोबत तिखट मिरच्या
जेंव्हा अझटेक साम्राज्य शेजारच्या टोळ्यांवर युद्धात विजय मिळवत असे, त्यावेळी कराच्या स्वरूपात ते त्यांच्याकडून कोकोच्या बियांची मागणी करत असत. अझटेक संस्कृतीमध्ये चॉकलेट इतके मौल्यवान मानले जात होते कि, अझटेक राजा मॉंटेझुमा एका दिवसामध्ये दर वेळेला वेगळा सोन्याचा कप, असे ५० कप चॉकलेट पेय दिवसाला पिअत असे. त्याकाळी अझटेक लोकांना साखर या पदार्थ माहीतच नसल्याने ते चॉकलेटच्या पेयात चक्क तिखट मिरच्यांचा वापर करत असत.
१५१९ मध्ये हर्नन कॉर्टेझने या स्पॅनिश सेनापतीने मेक्सिकोचा काही भाग जिंकून घेतला. त्याला स्वतःला चॉकलेटचे पेय अजिबात पसंत नव्हते, परंतु तरीही त्याने जिंकलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर कोकोच्या झाडांची लागवड केली. या काळातसुद्धा कोकोच्या बियांचा वापर पैसे म्हणून केला जात असे, त्यामुळे हे शेत म्हणजे त्याचा पैसे छापण्याचा एक कारखाना बनला होता.
१५ व्या शतकापर्यंत चॉकलेट यूरोपमध्ये तितकेसे लोकप्रिय झाले नव्हते. बऱ्याच लोकांना कोको बीन्स म्हणजे काय असते हेच ठाऊक नव्हते. एकदा तर ब्रिटिश सैन्याने पकडलेल्या स्पॅनिश जहाजातील कोकोच्या बियांना मेंढीची विष्टा समजून त्या संपूर्ण जहाजालाच आग लावून दिली होती.
१८२८ मध्ये कोकोची बियांपासून पावडर बनविण्याचे तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि त्यानतंर मात्र काही वर्षातच चॉकलेटची चव जगभरातील लोकांच्या जिभेवर रेंगाळायला लागली. कोकोची पावडर पाणी,दुधामध्ये मिसळून विविध आकारातील चॉकलेटची निर्मिती व्हायला लागली आणि चॉकलेटच्या आधुनिक युगाला सुरुवात झाली. आज जगभरात कॅडबरी, नेस्टले, हर्शीज,लिंड्ट सारख्या गेल्या शंभर वर्षांपासून चॉकलेटच्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत.