विधवा महिलांच्या उभ्या पिकांवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी फिरविला टॅक्टर
*पूर्व सूचना न देता केली लाखोंच्या पिकाची नुकसान ; महिलांनी पत्रकार परिषदेत केली नुकसान भरपाईची मागणी
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड-तालुक्यातील ओवाळा येथे 21 वर्षांपासून अतिक्रमण असलेल्या व सर्व शासकीय कागदोपत्री नोंद असलेल्या शेतात विविध प्रकारच्या उभ्या पिकांवर शेतीधारकांना कसलीही पूर्व सूचना न देता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी टॅक्टर फिरविला असल्याने गरीब,निराधार भूमिहीन विधवा महिलांची लाखों रुपयांची नुकसान झाली आहे. यामध्ये सदर महिलांना मारहाणही करण्यात आली आहे.हा प्रकार नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील असून ताराबाई मधुकर मोहर्ले व हिराबाई मधुकर मोहुर्ले अशी अन्यायग्रस्त महिलांची नावें आहेत.दोघीही शेतीमालक स्व.मधुकर मंगरू मोहुर्ले यांच्या पत्नी आहेत.व त्या जवळच्याच पळसगाव(खुर्द )या गावात राहतात.सदर घटना दि.30 जानेवारी रविवारी घडली.
स्व.मधुकर मोहुर्ले हे भूमिहीन होते.त्यांना दोन पत्नी आहेत.त्यांनी जवळपास 30 वर्षांपासून ओवाळा येथील गट क्र.97 या वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून धान्य व अन्य पिकं उत्पादन करीत उदरनिर्वाह करीत होते.आणि सन 2001मध्ये त्यांच्या अतिक्रमणीत जागेची शासकीय कागदोपत्री नोंद करण्यात आली. सदर जागेचा त्यांना गाव नमुना एक ई पंजी,ग्रामपंचायतचा दाखला, वनहक्क गाव समितीचा दाखला,नकाशा व अन्य दाखले मिळालें आहेत.त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या दोन्हीं पत्नीं ताराबाई मोहुर्ले व हिराबाई मोहुर्ले यांच्या नावाने सदर जमीन हस्तांतरित करण्यात आली.त्यांना मुलगा नसून मुलींची लग्न झाली आहेत.अन्य कुठलीही माल मत्ता त्यांच्याकडे नाही त्या दोघीही वृद्ध असून सदर शेतीच्या भरोशावरच त्या जीवन जगत आहेत. आजतागायत कुणीही त्यांना कुठलाही त्रास दिला नाही. मात्र अचानक कुठलीही पूर्व सूचना न देता वा कुठलेही पत्र न देता त्यांच्या शेतीवरील उभ्या पिकांवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावातील काही लोकांना हाताशी धरून दोन टॅक्टर चालवून विविध पिकांची धुळवण केली.यामध्ये त्यांनी मुंगफल्ली, सोनबोरू, हिरवी मिरची, भाजीपाला, तसेच उन्हाळी पिकाचे पऱ्हे आदी पिकांची लागवड केली होती.या सर्व पिकांना उदध्वस्त करण्यात आले असल्याने त्यांची लाखोंहुन अधिक रुपयांची नुकसान झाली आहे.हा हुकूमशाहीचा प्रकार असून हे जाणीवपूर्वक कटकारस्थान आहे.वस्तुत: सदर जमीन ही वनविभागाच्या अधिकारात आहे.मात्र अधिकाराचा दुरपयोग करून सरपंच निशा राजू सोनटक्के, उपसरपंच दयाराम लटारू गुंतीवार,ग्रामपंचायत सदस्य बंडू बकाराम शेंडे, ग्राम.पं.सदस्यां मालता वामन मोहुर्ले,शारदा विनायक मसराम,तंमुस अध्यक्ष मुखरू नामदेव उईके,घनशाम नकटु गेडाम, अरविंद बाजीराव भेंडारे, विनायक मसराम,रोजगार सेवक जगदीश हरिदास गेडाम आदींनी गावातील इतर लोकांना हाताशी धरून सदर अनुचित प्रकाराचे दर्शन घडविले.मोहुर्ले यांचे सदर गट नं.97 चे शेत स्वतंत्र असून गावाच्या स्मशान भूमिपासून अलिप्त आहे.हयाच गट नं.मध्ये गावातील शामराव मोहुर्ले यांचे सुद्धा शेत आहे. मात्र त्यांच्या पिकाला सुरक्षित ठेवण्यात आले. असा आरोप सदर महीलांनी केला असून या शेताच्या मधोमध नाला व बोकडो नदीचा संगम आलेला आहे.आणि पलीकडे स्मशान भूमी आहे. एरवी या स्मशानभूमीच्या सभोवताल गावातील अन्य लोकांनी अतिक्रमण केले आहे. शिवाय उपसरपंचाचे अन्य एक शेत व सरपंचाचे घरही अतिक्रमण जागेवर आहे. अशी ताराबाई व हिराबाई मोहुर्ले यांनी माहिती दिली असून दीड लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.अशी पत्रकार परिषदेत मागणी केली आहे.यावेळी पत्रकार परिषदेला ताराबाई मोहुर्ले, हिराबाई मोहुर्ले, भगवान मोहुर्ले, रवींद्र शिरबांधे यांची उपस्थिती होती.
———–
जबरदस्तीने शेतात गाडला मृतदेह
ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी महिलां ग्रा.पं. सदस्यांना पुढे करून दबंगिरी करीत गावातील एका महिलेचा मृतदेह श्रीमती मोहुर्ले यांच्या शेतात जबरदस्तीने गाढला. दरम्यान विरोध केला असता त्या वृद्ध महीलांना जमिनीवर लोळवून मारहाण करण्यात आली.यामध्ये हिराबाईच्या पायाला जबर मार लागला.व ताराबाईच्या छातीला मारहाण केली.
——————–
पोलिसांची संदिग्ध भूमिका, प्रशासनाची दिरंगाई
सदर अन्यायग्रस्त महिलांनी तळोधी पोलिसात तक्रार दाखल केली असता प्रथम टाळाटाळ करण्यात आली.नंतर तक्रार दाखल केली.मात्र अजुनपर्यन्त आरोपिंवर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.गुन्हा दाखल केल्याची प्रतही देण्यात आली नाही. शिवाय तहसीलदारांकडे तक्रार नोंदविली असता त्यांनीही कुठलीही चौकशी केली नसल्याचे सदर महिलांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले.
——————
” सदर कटात तंमुस अध्यक्ष मुखरू उईके,ग्रा पं.सदस्या शारदा मसराम व रोजगार सेवक जगदीश गेडाम सामील आहेत. मात्र ते स्वतः सन 2001मध्ये वनहक्क गाव समितीचे पदाधिकारी असताना व मुखरू उईके अध्यक्ष असताना स्व.मधुकर मोहुर्ले यांना वन हक्क समितीचा दाखला दिला आहे.यावरून त्यांच्या बौद्धिक क्षमतेची जाणीव करता येईल. “