पतीविरूद्ध पोलिसांत तक्रार देऊन परतताच पतीने हातोड्याने वार करून पत्नीची हत्या केल्या ची घटना समोर आली

त्रिशा राऊत

नागपुर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधीं

मो 9096817953 

पतीविरूद्ध पोलिसांत तक्रार देऊन परतताच पतीने हातोड्याने वार करून पत्नीची हत्या केली. ही थरारक घटना बुधवारी दुपारी कळमना स्टेशनअंतर्गत मिनीमातानगर येथे घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी मारेकरी पतीला अटक केली आहे. अमर भारद्वाज (वय ५०), असे अटकेतील पतीचे तर ललिता भारद्वाज (वय ४०), असे मृतकाचे नाव आहे.

अमर याचा फळभाजी विक्रीचा व्यवसाय असून, ललिता या ब्युटी पार्लरमध्ये काम करायच्या. त्यांना दोन मुली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अमर हा पत्नी ललिताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू असून, दोघेही एकाच घरात वेगवेगळे राहतात. ललिता या मुलींचा सांभाळ करायच्या. मंगळवारी दुपारी नळ फिटिंग करणारा युवक कामानिमित्त ललिता यांच्याकडे आला. याबाबत अमरला कळताच त्याने ललिता यांच्याशी वाद घातला. बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ललिता यांनी कळमना पोलिस स्टेशनमध्ये अमरविरूद्ध तक्रार दिली.

पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. ललिता घरी परतल्या. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अमरने पुन्हा ललिता यांच्याशी वाद घातला. यावेळी त्यांच्या मुली पहिल्या माळ्यावरील खोलीत होत्या.संतप्त अमरने हतोड्याने ललितांच्या डोक्यावर वार केले. ललिता यांनी आरडाओरड केली. त्यांच्या मुली तळमजल्यावरील खोलीत आल्या. तोपर्यंत ललिता यांचा मृत्यू झाला होता.

मुलींना धायमोकलून रडायला सुरूवात केली. शेजारी जमले. तत्पूर्वी अमर हा कळमना पोलिस ठाणे गाठून हजर झाला. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह कळमना पोलिसांचा ताफा मिनीमातानगरमध्ये पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अमरला अटक केली.

प्रत्येक तक्रारीवर वेळीच कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. असे असतानाही कळमना पोलिसांनी ललिता यांनी दिलेल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली नाही. अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेळीच त्याला चौकशीसाठी बोलावले असते तर खुनाची घटना टळली असती, अशी चर्चा परिसरात आहे. याची चौकशी करण्यात येईल, दोषी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरूद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here