घरातील प्रत्येकाला माहीत आहे की, आपला पक्ष पुढे कसा जाणार…शरद पवारांचे विधान

मीडियावार्ता, ९ मे:राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा इथे पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी काही दिवसांपूर्वी झालेले राजीनामा प्रकरण, पक्षाचे भविष्य, कर्नाटक निवडणूक यांसारख्या विषयांवर पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भविष्य संदर्भात बोलताना ते म्हणाले की, घरामध्ये आमच्यातील प्रत्येक सहकाऱ्याला माहीत आहे की, आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. नेतृत्वाची फळी पक्षामध्ये कशी तयार केली जाणार याची खात्री पक्षातील सर्व सहकाऱ्यांना आहे. १९९९ साली आम्ही सत्तेत आलो तेव्हा आम्हाला मंत्रिमंडळ तयार करायचे होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे संयुक्त मंत्रिमंडळ होते. त्या मंत्रिमंडळात जयंतराव पाटील, अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, आर. आर. पाटील अशी अनेक नावं होती ज्यांची ती पहिली टर्म होती. त्यांची नियुक्ती केली. मी जेव्हा मंत्रिमंडळात गेलो तेव्हा मला पहिले राज्यमंत्री पद मिळाले. काही वर्षे राज्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर मला प्रमोशन मिळाले. पण आता मी जी नावं घेतली त्या सर्वांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि महाराष्ट्राने बघितले की त्या प्रत्येकाने आपले कर्तृत्व सिद्ध केले.

याबद्दल कोणी काय लिहिले याचे महत्त्व आमच्या दृष्टीने नाही. त्यांचा लिहिण्याचा अधिकार आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही काय करतो आम्हाला ठाऊक आहे व त्यात आम्हाला समाधान आहे. राष्ट्रीय पक्षांच्या धोरणामध्ये प्रत्येकाची भूमिका सहकारी पक्षाबरोबर १०० टक्के जुळेल असं कधी होत नाही. काही गोष्टीपुढे-मागे असतात, काही मतं वेगळी असतात. त्याबद्दल आमच्यात गैरसमज नाही. त्यामुळे महाविकास आघाडीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणुकी बाबत बोलताना शरद पवार म्हणाले की,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही मित्रपक्षाशी संपर्क केलेला नाही. याचे कारण म्हणजे आम्हाला शून्यातून सुरुवात करायची होती. ज्यावेळी विविध पक्षांसोबत एकत्रित निवडणूक लढवण्याची भूमिका घ्यायची असते तेव्हा त्या मित्रपक्षाला आपण काही शक्ती देण्याची खात्री द्यावी लागते. आम्ही कर्नाटकात सुरुवात करत असल्याने अशी खात्री देणे योग्य होणार नाही. मर्यादित जागेवर निवडणूक लढवत असल्याने याचा वाईट असा परिणाम काँग्रेसवर होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे.

निवडणुकीचा फॉर्म भरताना लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यावर विश्वास आहे, अशी शपथ घेतली जाते. ही शपथ घेतल्यानंतर धर्माच्या आणि जातीच्या नावाने मतं मागणे म्हणजे त्या शपथेचा भंग आहे. मला गंमत वाटते की, देशाचे प्रधानमंत्री या प्रकारची भूमिकालोकांसमोर मांडतात. तुमच्या हाती सत्ता असताना काय केले हे सांगणे गरजेचे आहे.

दुर्दैवाने अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पंचनामे झाले असले तरी दोन आठवडे उलटूनदेखील शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे मदतीसाठी लोक अस्वस्थ आहेत. असे संकट आल्यानंतर पक्ष वगैरे न पाहता राज्य सरकारने सर्वांना सोबत घेऊन ते प्रश्न सोडवायला हातभार लावावा. त्याशिवाय गत्यंतर नाही, अशी सूचना शरद पवारांनी शिंदे फडणवीस सरकारला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here