घटस्फोटाचे वाढते प्रमाण…

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो:९९२२५४६२९५

चिंताजनक लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. पूर्वी या गाठी घट्ट बांधल्या जायच्या कारण या गाठी आयुष्यभर तुटत नसायच्या. इतकंच काय तर हाच जोडीदार पुढील सात जन्मी मिळो अशी प्रार्थना पतिपत्नी देवाकडे करायचे. हल्ली मात्र या लग्नाच्या गाठी सैल बांधल्या जातात की काय अशी शंका येऊ लागली आहे कारण आयष्यभर सोडाच पण काही वर्षे देखील विवाह झालेले दांपत्य एकत्र नांदायला तयार नाहीत. लग्नानंतर अवघ्या काही वर्षात पतीपत्नीमध्ये वाद होतो आणि हा वाद थेट घटस्फोटापर्यंत पोहचतो. आज देशातील न्यायालयात घटस्फोटाचे लाखो याचिका प्रलंबित आहेत. दररोज त्यात भर पडतेच, घटस्फोटाची नवी याचिका दाखल झाली नाही असा एकही दिवस उगवत नाही.

घटस्फोटाचे लाखो खटले प्रलंबित असल्याने सहा महिन्यांचा आत घटस्फोटाचा निकाल द्यावा असा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. घटस्फोटाचे खटले तातडीने निकाली काढले जात असले तरी त्यात नव्याने भर पडत असल्याने न्यायालयही हतबल झाले आहे. वास्तविक दोन दशकांपूर्वी घटस्फोटाचे प्रकरण नगण्य स्वरूपात होते. शेवटचा पर्याय म्हणून घटस्फोटाकडे पाहिले जात होते आज मात्र अगदी किरकोळ कारणांवरून देखील घटस्फोट मागितला जातो. आज न्यायालयात दाखल होणाऱ्या घटस्फोटाची कारणे पाहिले तर चक्रावून जाल. पत्नीला साडी नेसता येत नाही, पत्नीने केलेला स्वयंपाक बेचव असतो, पत्नी सतत टीव्ही आणि मोबाईलवर असते, पत्नी आपला मान राखत नाही यासारख्या हास्यास्पद आणि मनाला न पटणाऱ्या कारणांनी घटस्फोट मागितला जातो. पत्नीकडूनही घटस्फोटाची अशीच काहीबाही कारणे दिली जातात. पती आपल्याला वेळ देत नाही. पती फक्त त्याच्या आई वडिलांचेच ऐकतो, पती आपल्याला बाहेर फिरायला नेत नाही, पती आपल्या मनासारखं वागत नाही अशी हास्यास्पद कारणे देऊन घटस्फोटाची मागणी केली जाते.

घटस्फोटाची ही किरकोळ कारणे जितकी हास्यास्पद वाटतात तितकीच ती चिंताजनक देखील आहेत कारण अशा किरकोळ कारणांनी जर घटस्फोट होऊ लागला तर विवाह संस्थाच धोक्यात येईल. याशिवाय पती मारहाण करतो, अनैसर्गिक संबंधांची मागणी करतो, पत्नी उलट बोलते, पती म्हणून मान देत नाही अशा कारणांनी देखील घटस्फोटाची मागणी केली जाते अशी आणि यापेक्षाही अनेक वेगवेगळी कारणे घटस्फोटासाठी दिली जातात अर्थात सर्व कारणांचा अभ्यास करूनच न्यायालय घटस्फोटाचा निकाल देते. अर्थात अशा किरकोळ कारणांसाठी घटस्फोटाची मागणी करणे कितपत योग्य आहे याचा विचार दोघांनीही करायला हवे.

नाते कोणतेही असो त्यात राग रुसवा असतोच, संसार म्हटले की भांड्याला भांडे लागतेच, जर दोघात वाद झाला की दोघांपैकी एकाने शांत राहावे थोड्या वेळात राग शांत होतो आणि वादही मिटतो मात्र शब्दला शब्द दिला की वाद वाढतो आणि वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होते. त्यात दोन्ही कडील नात्यात कोणीना कोणी तेल ओतणारा असतोच, असे तेल ओतणारे व्यक्ती आल्यास हा वाद थेट न्यायालयात पोहचतो. अगदी क्षुल्लक कारणही नाते तोडायला पुरेसे ठरत असल्याने नात्याची गुंफण घालताना थोडे सावरूनच वागावे लागते. माझे चुकलेच हे मनाने मान्य करावे लागते. तरच नाते टिकते आणि त्यातही गोडवा राहतो.

नात्यात सर्वात महत्वाचा असतो तो विश्वास. जर विश्वासाला तडा गेला तर नात्यात वितुष्ट येतेच म्हणून पतिपत्नी मध्ये विश्वास खूप महत्वाचा आहे विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी दोघांचीही आहे. नात्यात दुरावा होण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे पतीपत्नीमध्ये असलेला अहंकार. अहंकारामुळेच नाती तुटतात म्हणूनच दोघांनीही अहंकार दूर ठेवायला हवा. अहंकाराला दूर ठेवून परस्परावरील विश्वास कायम ठेवला तर नात्यात दुरावा निर्माण होणार नाही आणि घटस्फोटाचे प्रमाणही कमी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here