रत्यावरील खड्डे ‘स्लॅग’ने भरण्याचा ‘जावईशोध’
एमएसआरडीसीचा अजब कारभार
ही डागडुजी जीवावर बेतण्याची शक्यता
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-अलिबाग-रेवदंडा रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे; परंतु एमएसआरडीसीकडून खड्डे बुजवताना जेएसडब्ल्यू कडून बाहेर टाकण्यात येणाऱ्या स्लॅगचा वापर करून डागडुजी केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे रेडिमिक्स डांबराच्या साहाय्याने बुजवणे गरजेचे असताना स्लॅगचा वापर करून खड्डे बुजवण्याचा ‘जावईशोध’ एमएसआरडीसीने लावला असून, या अजब कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
अलिबाग-रेवदंडा रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांच्या जीवावर उठले आहेत. त्याची दखल एमएसआरडीसी प्रशासन कशाप्रकारे घेत आहे, याचे जिवंत उदाहरण सध्या पाहावयास मिळत आहे. खड्डे बुजवण्यासाठी जेएसडब्ल्यूकडून बाहेर टाकण्यात येणाऱ्या स्लॅगचा वापर केला जात असल्याने वाहनचालकांमध्ये संताप आहे. पावसानंतर या रस्त्यांची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. काँक्रिट आणि डांबरीकरणाच्या रस्त्याला गावरस्त्याचे स्वरूप आले आहे. या रस्त्यांवर मोजता येणार नाहीत, इतके चार ते पाच फूट लांब व सव्वा फुट, 2 फुटार्यंत खोलीचे खड्डे पडले होते. त्यात काही खड्डे चक्क मोठ-मोठे दगड टाकून हे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले होते. खड्ड्यांमुळे वाहनचालकांची हाडे खिळखिळी झाली आहेत. रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप वाहनचालकांमधून होत आहे.
अलिबाग-रेवदंडा हा रस्ता नागाव, मुरुड या पर्यटन स्थळा ना जोडणारा एकमेव मार्ग आहे. त्यात अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे या रस्त्याचे भरभक्कम काम करावे, अशी मागणी होत आहे. तथापि, रस्त्यांवरील खड्डे चक्क कचरा टाकून बुजवण्यात आल्याचे प्रकारही समोर आले होते. त्यामुळे दुचाकीस्वार व पादचारी घसरून पडत आहेत. मात्र, त्यानंतरही खड्डे बुजवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नसल्याचेच चित्र आहे. अद्यापही बहुतांश रस्त्यांवरील खड्डे कायम असून या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्याचाही वाहनचालकांना त्रास होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज कुठल्या ना कुठल्या वाहनाचे छोटे-मोठे अपघात होतच असतात. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी पसरली असून, स्लॅग ऐवजी खडी व डांबर टाकून खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात येत आहे. या सर्व मार्गांची दयनीय अवस्था झाली आहे.
दिवसभरात येथील खड्डे तात्काळ सिमेंट काँक्रिटने भरण्यात येतील. वाहनचालकांचा जीव महत्वाचा आहे. त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. – बसवंत सिंग, कार्यकारी अभियंता, msrdc