पोलादपूर तालुक्यात “सवाद माध्यमिक शाळा” येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न
शिक्षणासाठी इच्छाशक्ती असेल व वकील डॉक्टर होण्याची इच्छा असेल तर संपूर्ण खर्चाची जबाबदारी माझी – कृष्णा कदम यांची विद्यार्थ्यांना ग्वाही
सिध्देश पवार,
तालुका प्रतिनिधी पोलादपूर
8482851532
पोलादपूर :- पोलादपूर तालुक्यातील सवाद माध्यमिक शाळेत नुकताच शालेय शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा उपक्रम वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. तालुक्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी या हेतूने ते गेल्या दोन महिन्यांपासून विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य, छत्र्या यांचे मोफत वाटप करत आहेत.
कार्यक्रमादरम्यान बोलताना कृष्णा कदम यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान करत सांगितले की, “माझ्या पोलादपूर तालुक्यातील गरिब आणि शिक्षणाची आवड असणारा एक तरी विद्यार्थी डॉक्टर किंवा वकील बनावा, यासाठी त्याचा संपूर्ण खर्च मी उचलण्यास तयार आहे.” या त्यांच्या वचनाने उपस्थितांमध्ये आशेचा नवा किरण निर्माण झाला.
या वेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे निवृत्त अधिकारी श्री. धनंजय पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षा देण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, गरजू विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय मदत कक्ष नेहमीच तत्पर आहे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास वैद्यकीय मदत मोफत मिळू शकते. “मी धनंजय पवार, कोणत्याही गरजवंतासाठी सदैव मदतीसाठी उभा आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
प्रेस क्लब पोलादपूरचे सचिव पत्रकार श्री. संदीप जाबडे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “कृष्णा कदम यांनी स्वतःच्या खडतर प्रवासातून शिक्षण घेतले आहे. साध्या वाटणाऱ्या या माणसाचे कार्य मात्र विलक्षण आहे. असा समाजहितासाठी झटणारा व्यक्ती पोलादपूरला लाभलेला हा आमचा भाग्ययोग आहे.”
कार्यक्रमास वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री कृष्णा कदम तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष श्री धनंजय पवार तसेच प्रेस क्लबचे सचिव व कोकण न्युज चे संपादक श्री संदीप जाबडे सवाद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय उतेकर, पत्रकार सिध्देश पवार, शिक्षक वृंद, पालक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि छत्र्यांचे वाटप करून त्यांच्यात शिक्षणाबद्दलचा आत्मविश्वास वाढविण्यात आला.
या उपक्रमामुळे समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश पोहोचत असून, अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही भविष्यात मोठी स्वप्नं पाहण्याची संधी मिळत आहे.