पोलादपूर तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
: सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर, ता. ९ ऑगस्ट:
“निसर्गाचे खरे रक्षक” म्हणून ओळखले जाणारे आदिवासी बांधवांनी आज पोलादपूर तालुक्यात जागतिक आदिवासी दिन अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरा केला. तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत भव्य शोभायात्रा काढत आपली संस्कृती आणि एकता दाखवून दिली.
गावातून निघालेल्या या शोभायात्रेत खालुबाजाच्या पारंपरिक ठेक्यावर आदिवासी युवक-युवतींनी नृत्य सादर करत झेंडे फडकावले. ही मिरवणूक रंग-बेरंगी पोशाख, पारंपरिक वाद्ये आणि सांस्कृतिक आकर्षणांनी नटलेली होती. यामुळे गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
या विशेष दिनानिमित्त कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. या कार्यक्रमात तहसीलदार श्री. कपिल घोरपडे यांच्या हस्ते उपस्थितांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांमुळे आदिवासी समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे या प्रसंगी दिसून आले.
कार्यक्रमाला महसूल विभागाचे अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. लक्ष्मण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणांतून आदिवासी समाजाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.
राज्याचे मंत्री नामदार भरत शेठ गोगावले हे विशेष कामानिमित्त मुंबईत असल्यामुळे त्यांच्या वतीने लक्ष्मण मोरे यांनी उपस्थित राहून आदिवासी बांधवांना नामदार साहेबांच्या शुभेच्छा दिल्या. “नामदार साहेब नेहमीच आदिवासी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत”, असेही त्यांनी नमूद केले.
संपूर्ण कार्यक्रम पारंपरिकतेची जाणीव ठेवत, सामाजिक एकतेचा आणि संस्कृतीच्या जपणुकीचा संदेश देत अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने पोलादपूर तालुक्यातील सांस्कृतिक ऐक्याचे सुंदर दर्शन या कार्यक्रमातून घडले.