नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक! बनावट नियुक्तीपत्रही दिले
नागपूर : गरजुंना नोकरीचे आमिष दाखवून लुबाडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होते आहे. अशा घटना वारंवार घडत असूनही नागरिक खातरजमा ह करता अशा फसवणुकीला बळी पडतात.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आशिष ऊर्फ सोनू मून वय ३२, रा. थॉयराईड केअर पॅथॉलॉजी, वर्धा, दर्शन कोटमवार वय ३८ रा. नेताजी चौक, बाबुपेठ, चंद्रपूर, हरिष उरकुडे वय ३५, गायकवाड नावाची बाई आणि एका अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल रामकृष्ण लेंदे वय २९, रा. श्रीराम वार्ड महादेव मंदिरजवळ चंद्रपूर याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींची भेट नागपुरातील दीक्षाभूमीसमोरील आरोग्य उपसंचालक कार्यालयात झाली. त्यावेळी आरोपींनी आरोग्य उपसंचालक कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले व त्याच्याकडून ५० हजार रुपये घेतले. काही दिवसांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मेडिकल नोकरीचे आमिष दाखवून १२ लाख रुपये मागितले. आरोपींनी संगनमताने त्याला बनावट नियुक्तीपत्रही दिले. तो आरोग्य उपसंचालक कार्यालयात गेला असता ते बनावट असल्याचे समोर आले. तसेच मेडिकलच्या नावानेही बनावट नियुक्तीपत्र दिले. डोळे उघडल्यानंतर राहुलने पोलिसांत तक्रार दिली. बजाजनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.