जवळपास वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंधूदुर्गातील चिपी परुळे येथील डोमेस्टिक विमानतळाचा शुभारंभ आज दुपारी एक वाजता होणार आहे. विमानतळ सुरु झाल्याने सिंधूदुर्ग जिह्यातील पर्यटनाला अजून चालना मिळण्याची आशा आहे.

सिद्धांत
मुंबई दि. ९ ऑक्टोबर २०२१: जवळपास वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंधूदुर्गातील चिपी परुळे येथील डोमेस्टिक विमानतळाचा शुभारंभ आज दुपारी एक वाजता होणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे एकत्र व्यासपीठावर दिसणार आहेत. नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर या भेटीदरम्यान काय घडेल ? ते काय बोलतील याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. इकडे विमानतळ उभारण्याच्या श्रेयवादावरून राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
नारायण राणे नाराज?
उदघाटन कार्यक्रम पत्रिकेवर आपलं नाव बारीक अक्षरात घातल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे नाराज आहेत. राजकारणामध्ये मी इतर मान्यवरांपेक्षा सीनिअर आहे. तरीही माझे नाव तिसरे आहे. हि ठाकरे सरकारची संकुचित वृत्ती आहे. चिपी विमानतळाचं काम मीच केलं आहे आणि त्यासाठीच श्रेय माझे आणि भाजपचे आहे. उदघाटन कार्यक्रमात देखील हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे नारायण राणें पत्रकार परिषद घेत म्हणाले होते.

सिंधुदुर्गातील या विमानतळ चिपी हे नावं का देण्यात आले?
एखाद्या सार्वजनिक वास्तु किंवा प्रक्लपाचे नाव जाहीर झाल्यावर त्याचे नाव काय ठेवावे यावरून नेहमीच वाद होत असतात. विविध राजकीय पक्ष आणि नेते त्याद्वारे आपला अजेंडा पुढे रेटत असतात. पण मग सिंधूदुर्गातील पहिल्या विमानतळाचे नाव चिपी असे का बरे ठेवले असेल?
खरतर हे विमानतळ बांधलं गेलंय परुळे गावातील “चिपी” या वाडीमध्ये. विमानतळ बांधण्यासाठी गावातील लोकांनी आपल्या जमिनी दिल्या. तसेच विमानतळाच्या नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची रास्त मागणी सरकारकडून मान्य करून घेतली. या विमानतळापासून मालवण तालुका १२ किलोमीटर तर कुडाळ २४ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या हा विमानतळ डोमेस्टिक अर्थात देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी वापरला जाईल. भविष्यात गरज पडल्यास विस्तारीकरण करण्यासाठी पुरेशी जागा विमानतळ परिसरात उपलब्ध आहे.

चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार चालना.
अथांग समुद्रकिनारा, स्वच्छ वातावरण आणि चविष्ट खाद्यसंस्कृती ह्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. आता विमानतळ सुरु झाल्याने जिह्यातील पर्यटनाला अजून चालना मिळण्याची आशा आहे. चिपी विमानतळापासून ब्लू फ्लॅग मानांकन मिळालेला भोगवे समुद्रकिनारा १४.५ किलोमीटर असून मालवण सिंधुदुर्ग किल्ला १४ किलोमीटरवर आहे. तसेच जगप्रसिद्ध वेंगुर्ले समुद्र किनारा ३५ किलोमीटर अंतरावर असल्याने कोकणातील समुद्र पर्यटनाकडे लोकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. ह्यामुळे कोकणातील पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.