मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे दिमाखात उदघाटन. मंत्र्यांनी भाषणांमध्ये केली पुरेपूर टोमणाबाजी. कोण काय बोललं?

58

चिपी विमानतळाच्या उदघाटन सोहळ्यास सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. पण सर्वाना आकर्षण होते ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या भेटीचे.

चिपी विमानतळाच्या उदघाटन सोहळ्यास सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. पण सर्वाना आकर्षण होते ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या भेटीचे.

सिद्धांत
मुंबई दि. ९ ऑक्टोबर २०२१: आज दुपारी सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा उदघाटन सोहळा दिमाखात पार पडला. ह्या सोहळ्यास अजित पवार, रामदास आठवले, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, विनायक राऊत यांसारखे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. पण सर्वाना आकर्षण होते ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या भेटीचे. दोघांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रम सुरु असताना मात्र दोघांमध्ये कोणतेही संभाषण झाले नाही. यावेळी चिपी विमानतळामुळे होणार कोकणचा विकास यासदंर्भात आपली मनोगत व्यक्त केली. त्याचबरोबर भाषणामध्ये विरोधी पक्षावर पुरेपूर प्रमाणात टोमणेबाजी झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये काय म्हणाले?
आजचा क्षण आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. पुढे ते म्हणाले कि, शिवसेना आणि कोकण हे नातं मी सांगायला नको. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असणे गरजेचे आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. एवढे वर्षे विमानतळाला का लागले? बाळासाहेब म्हणाले होते कि, कॅलिफोर्नियाला अभिमान वाटेल असे कोकण उभा करू.बाकीच्या गोष्टी आदित्य सांगेलच. पाठांतर करून बोलणं वेगळं, आत्मसात करून बोलणं वेगळं. मळमळीने बोलणं आणखी वेगळं असत, त्याबद्दल मी नंतर बोलेन.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. त्यांना संबोधत मुख्यमंत्री म्हणाले कि, आपण एकत्र येऊन विकास करुयात. जे काही आधीचे विकासाच्या बाबतीत बोलून गेले आहेत त्याबाबत मी परत बोलणार नाही. पण महाराजांचे किल्ले. निदान सिंधुदुर्गाचा किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे.नाहीतर कोणतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला. आपल्या भाषणात त्यांनी नारायण राणेंचा देखील उल्लेख केला.

नारायण राणे आपण म्हणालात ते खरं आहे. या विमातळासाठी काही गोष्टी तुम्ही केल्या त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत, संयमी आहे. म्हणून विनायक राऊत इथे निवडून आलेले खासदार म्हणून उभे आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. हेही खरं आहे. बाळासाहेबांना खोटं बोलणं अजिबात आवडायचं नाही. अशी खोटं बोलणारी जी लोकं होती त्यांना बाळासाहेबांनी शिवेसेनेतून काढून टाकलं होतं हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोला. मला त्या इतिहासात जायचं नाही. आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे. मी कुठेही पक्षभेद आणत नाही.

पुढे आपल्या भाषणाचा समारोप करत मुख्यमंत्री म्हणाले कि, खड्ड्यात गेलेली लोकशाही, असं बोलण्याची वेळ निदान त्यांच्यावर येऊ द्यायची नसेल तर विकासाच्या कामात राजकीय जोडे आणू नयेत.

नारायण राणे आपल्या भाषणात काय म्हणाले?

माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण. माझा जन्म इकडचाच. बाळासाहबे ठाकरे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जा आणि आलो. निवडणूक लढवली, १९९० साली जिंकलो. मी संपूर्ण जिल्हा फिरलो,अडचणी समजून घेतल्या. विकासकामे केली. सिंधूदुर्गाला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलं. हे सगळं बाळासाहेबांकडून घेतलेल्या प्रेरणेनतूनच. सन्मानीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत, त्यांनी अभ्यास करावा. ४८१ पानाचा टाटांनी दिलेला रिपोर्ट वाचावा. पैसे खर्च करावे.

यापढे महाविकास आघाडीवर टीका करत ते म्हणाले कि, धरणाची कामं पुढे जात नाहीत, माझ्यावेळी जेवढी झाली त्याच्या पुढे कामंच नाहीत. ह्या विमानतळाला पाणी नाही. रस्ता नाही,पाणी नाही. कसला विकास? विमानातून उतरल्यानंतर लोकांनी काय पाहावे? विमानतळाचे उदघाटन करण्यापूर्वी रस्ते आणि अन्य कामं करावी.

रामदास आठवलेंची कविता.
भाषणाच्यावेळी रामदास आठवलेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत कविता ऐकवली.
सिंधुदुर्गाच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान
कारण चिपीमध्ये आलेलं आहे मुंबईवरुन विमान
इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे
मला आठवले महायुतीचे गाणे

अजित पवारांनी केला नितीन गडकरींचा उल्लेख.
जगातील लोक गोवा पाहायला येतात, पण गोवा इतकं चांगेल समुद्र किनारे आपल्या कोकणाला लाभले आहेत, त्याला चालना देण्यासाठी आपण काम केलं. विमानातून येताना मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा चालू होती. कोकणात वेगाने विकास कामे करण्याचे आश्वासन देत, अजित पवार पुढे म्हणाले कि, महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात काम करत आहे, उद्याच्या ११ तारखेला नितीन गडकरींच्या भेटीची वेळ मागितली. मुंबई-गोवा हायवेचं काम रखडलंय, रेड्डी बंदराचे कामं सुरु करण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतलाय, या संदर्भात ११ ऑक्टोबरला नितीन गडकरींच्या भेटीची वेळ मागितली आहे.