राज्यातील आरक्षण मुद्दा पेटलां, मराठा आरक्षणाविरोधात कुणबी समाज आक्रमक
संजय पंडित
दि.९,मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानावर आज राज्यातील कुणबी समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला. यानंतर ओबीसी समाजाकडून मराठा आरक्षणाच्या जीआरचा कडाडून विरोध करण्यात येत आहे. आता ओबीसी आरक्षण आणि कुणबी दाखला अबाधित ठेवण्यासाठी आज गुरुवार दि.९ रोजी कुणबी समाजाने आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली होती.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतील कुणबी समाजाचे हजारो बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगने व उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सरकारने मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करताच, कुणबी समाजाने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर दिलेल्या निर्णयाचा विरोध करत सरसकट GR रद्द करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान कुणबी समाजाच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
१.मराठा समाजाला शासनाने दिलेले OBC आरक्षण रद्द करावे.
२.घटनाबाह्य न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी.
३ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती मिळावी.
४.जातिनिहाय जनगणना करावी.
५.शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र दर्जा व १५० कोटी रुपये आर्थिक तरतूद.
६.लोकनेते शामराव पेजे न्यासासाठी ५० कोटी निधी देणे.
७.पेजे व म्हसकर समितीच्या प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात.
८.कोकणातील कुणबींच्या खोत जमिनीवरील नोंदी कराव्यात.
९.जन्माने व कर्माने कुणबी असूनही आर्थिक मागास स्थितीत असलेल्या समाजाला जात दाखला मिळवून शिक्षणातील नुकसान टाळावे.
दरम्यान या आंदोलनाच्या माध्यमातून कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारला थेट इशारा वजा चेतावणीच दिली आहे.सरकारने आमच्या आरक्षणाच्या मुद्याकडे तत्काळ लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आजचा हा मोर्चा भविष्यात अधिक उग्र रूप आंदोलनाचे रूप घेईल असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या नोंदीवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाने आरक्षणाचा मुद्दा पेटणार असून आरक्षणाचे राजकारण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपल्याचे दिसत आहे.