अलिबाग नगरपरिषद चे आरक्षण सोडत जाहीर
महिला व पुरुषांना समान संधी
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग नगरपरिषदेच्या सदस्य पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. चिठ्ठी सोडत पध्दतीने हे आरक्षण काढण्यात आले. दहा प्रभागात महिला व पुरुषांना समान संधी या निवडणुकीत मिळणार आहे. अलिबागचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाचा कार्यक्रम नगरपरिषदेच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक उपस्थित होते.
2016 मध्ये झालेल्या अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकिचा . 2021 मध्ये कार्यकाल संपला. तेव्हापासून नगर परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रशासनाद्वारे शहराचा कारभार चालविला जात आहे. सुरुवातीला मुख्याधिकारी म्हणून अंगाई साळुंखे होत्या. त्यांच्या बदलीनंतर मुरूडचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला. आता अलिबाग नगरपरिषदेवर पुर्ण वेळ प्रशासन अधिकारी म्हणून सागर साळुंखे गेल्या काही दिवसांपासून काम पहात आहेत. नगरपरिषदेची निवडणूक लांबणीवर गेल्याने गेली चार वर्षापासून अलिबाग नगरपरिषदेचा कारभार प्रशासकामार्फत चालत आहे. निवडणुका कधी होणार याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अखेर ही उत्कंठा संपण्याच्या वाटेवर आहे. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अलिबाग नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहिर झाले. खुला महिला प्रवर्गाचे आरक्षण ठेवण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या सदस्य पदांचे आरक्षण बुधवारी (दि.8) उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले. शहरातील दहा प्रभागामध्ये अ व ब प्रमाणे प्रत्येकी दोन उमेदवार असणार आहे. त्यामुळे प्रभाग एकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), सर्वसाधारण (महिला), प्रभाग दोनमध्ये अनुसूचित जमाती (महिला), सर्वसाधारण, प्रभाग तीनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण, प्रभाग चारमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण.
प्रभाग पाचमध्ये अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण. प्रभाग सहामध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग (सर्वसाधारण), सर्वसाधारण (महिला), प्रभाग सातमध्ये सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण, प्रभाग आठमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण, प्रभाग नऊमध्ये अनुसूचित जमाती (महिला), सर्वसाधारण, प्रभाग दहामध्ये अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) व सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण पडले आहे.या आरक्षणामध्ये महिला व पुरुषांना समान संधी देण्यात आली आहे.