देशात जात, पात, धर्माच्या नावाने फूट पाडण्याचा प्रकार सुरू
: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची घणाघाती टीका
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-
देशात सध्या जात, पात, धर्माच्या नावाने फूट पाडण्याचा प्रकार सुरू आहे. जात धर्मासाठी भांडा हा विचार सरकारने डोक्यात टाकला आहे. धर्माच्या नावाने तुमच्या हाती सत्ता येईल, मात्र त्याने जनतेचे भले होणार आहे का? असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि.९) अलिबागमध्ये उपस्थित केला. तसेच जातीच्या राजकारणातून बाहेर पडून हक्काची लढाई लढली पाहिजे, असे आवाहन बच्चू कडू यांनी जनतेला केले.
शेतकरी, मच्छीमार, दिव्यांग, मेंढपाळ यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यात हक्क यात्रा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी बच्चू कडू अलिबागमध्ये आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते अलिबाग शहरात प्रहार जनशक्ती जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
कोकणात पाय ठेवताना शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतोय. सामान्य जनतेच्या रक्षणासाठी जीवाचे रान तसेच रक्ताचा शेवटचा थेंब त्यांच्या कुटुंबाने सांडविला. मात्र सध्याचे राजकारणी केवळ जात, पात, धर्माच्या नावावर राजकारण करीत आहेत. एकही आमदार दिव्यांगांच्या प्रश्नावर विधानभवनात बोलत नाही. त्यांना मतदारांपेक्षा आपला पक्ष महत्वाचा वाटतोय, मतदारांची भीती उरली नाही. अशावेळी जनतेसाठी लढणार कोण, यासाठी आपण ही हक्क यात्रा काढली आहे. सध्या सरकार भावांना लुटा व लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये द्यायचे असे धोरण राबवित आहे. यावर प्रहार करायचा आहे. आपल्याला जातीच्या राजकारणातून बाहेर पडून हक्काची लढाई लढली पाहिजे, आपल्या अर्थकारणाची लढाई लढली पाहिजे असे आवाहन बच्चू कडू यांनी जनतेला केले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी जे जे करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
या वेळी दिव्यांगबांधव,कोळी,शेतकरी महिला व समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.सभेच्या सुरवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर बच्चू कडू यांची भव्य मिरवणूक काढली होती.त्या मध्ये बँड च्य्या तालावर महिला नि नृत्य केला.तर महिलांनी लेझीम नृत्य करीत बच्चू भाई कडू यांचे स्वागत केले.या कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पार्टी चे जिल्हयातील पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.