योग्य नियोजन करून गरुड झेप घ्या, भरारी घ्या: जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर
योग्य नियोजन करून गरुड झेप घ्या, भरारी घ्या: जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

योग्य नियोजन करून गरुड झेप घ्या, भरारी घ्या: जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून पेण येथे “गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र” सुरू

योग्य नियोजन करून गरुड झेप घ्या, भरारी घ्या: जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर
योग्य नियोजन करून गरुड झेप घ्या, भरारी घ्या: जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

अलिबाग,जि.रायगड :- “गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” केंद्राचा हेतू स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखविणे हा आहे. अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके विकत घेण्यास अडचणी येतात. अशा गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. तुम्ही वेळ वाया घालवू नका, कोणत्या वेळेत काय करायचे आहे, हे ठरवा, योग्य नियोजन करून गरुड झेप घ्या, भरारी घ्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नुकतेच पेण येथे केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत “गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र” सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे शनिवार, दि.04 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण येथील भाऊसाहेब नेने कॉलेज हॉल येथील या मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रांताधिकारी श्री.विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, तहसिलदार अक्षय ढाकणे, पेण मुख्याधिकारी श्री.जीवन पाटील, भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचे संस्थापक श्री.मंगेश नेने, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.सदानंद धारप, शिवचरित्रकार श्री.प्रशांत देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर म्हणाले की, स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल तर अभ्यासात सातत्य हवे. स्पर्धा परिक्षेत आकलन आणि त्यासोबतच मांडणी ही फार महत्वाची आहे. कोणीतरी काहीतरी करतंय म्हणून तुम्ही ते करू नका. तुमचे स्वत:चे जे ध्येय आहे, तुम्हाला जे करायचं आहे तेच करा. संवाद साधत रहा. कारण संवाद साधल्याने तुम्ही तळागळातील लोकांपर्यंत पोहोचू शकता. आयुष्याचे अन् अभ्यासाचे योग्य नियोजन करून गरूड झेप घ्या, भरारी घ्या.

येत्या 10 डिसेंबरला ‘यू.पी.एस.सी का करावी?’ या विषयावर सायंकाळी 4 ते 5 वा. या वेळेत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, या केंद्रामागील माझी संकल्पना काय आहे यापेक्षा हे केंद्र का आवश्यक आहे, हे महत्वाचे आहे. जिल्ह्यात कार्यरत असताना आम्ही महसूल अधिकारी कुणी जागेवर अतिक्रमण केलं तर त्यांच्यावर कारवाई, वाळूमाफियांवर कारवाई अशा प्रकारच्या विविध कारवाया करीत असतो. या सर्व गोष्टी करीत असताना आम्ही महसूल अधिकारी म्हणून, जिल्ह्याचे प्रशासकीय पालकत्व किंवा नेतृत्व करीत असताना मी नेहमीच विचार करीत आलोय की, या जिल्ह्यामध्ये काय गरजेचे आहे? या जिल्ह्याची डेमोग्राफी अभ्यासल्यानंतर असे लक्षात आले की, या जिल्ह्यात पुरुष आणि स्त्री यांच्यातील स्त्री चे प्रमाण महाराष्ट्रातील सरासरी स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा बऱ्यापैकी जास्त आहे. रायगड जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अनन्यसाधारण असा वारसा लाभलेला आहे. इथे पराक्रमी मराठा साम्राज्य उभारले गेले होते. इथेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. एवढंच नव्हे तर आय.ए.एस परिक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन केंद्रात ज्यांनी काम केले असे आय.ए.एस अधिकारी देखील आपल्याकडे होऊन गेले आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीच्या इतक्या जवळचा जिल्हा असूनही, सर्व गोष्टी उपलब्ध असूनही या जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षेतला टक्का मात्र का कमी आहे, हे माझ्यासमोर एक कोडेच होते.

जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर पुढे म्हणाले, शिवचरित्रकार श्री. प्रशांत देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे शिक्षण अभियांत्रिकीमधून केले. पण त्यांना इतिहासाची आवड असल्यामुळे ते या क्षेत्राकडे वळले. आपल्याकडेही असे बरेचसे विद्यार्थी असतात की ज्यांना नक्की काय करायचे हेच माहिती नसते. परंतू एखादा कळप जसा असतो. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये असताना ॲग्रीकल्चरचे विद्यार्थी असतील तर त्यांना कळप म्हणत असू. त्याचे कारण असे की, एकाने स्पर्धा परिक्षेचा फॉर्म भरला की, त्याच्यामागे शंभर जण त्या परीक्षेचा भरायचे. त्याच पद्धतीने आपणही असे केले पाहिजे, आपला जो छंद आहे, जी जिद्द आहे ते मनापासून करायला पाहिजे. पण केवळ करायचं म्हणून करायचं असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही आणि कालांतराने आपल्याला जॉब सॅटिसफॅक्शनही मिळत नाही, ही बाब सगळ्यात आधी आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे जे आपल्याला करायचं आहे तेच झालं पाहिजे. माझ्या वडिलांचा नेहमी असा आग्रह होता की, मी डॉक्टर व्हावं, कारण तेही डॉक्टरच होते. पण मला ते कधीच जमले नाही. मला तेवढे मार्कही पडले नाहीत. त्यामुळे एक लक्षात घ्या की, स्पर्धा परिक्षेत यशस्वी व्हायचे म्हणजे खूप मार्क पाहिजे, खूप हुशार पाहिजे असे काही नाही. माझ्या दृष्टीने काय पाहिजे तर सातत्य, नियोजन. गरुड पक्षी जसा त्याच्या लक्ष्यावर झेप मारतो त्याचप्रमाणे आपणही आपले लक्ष्य ठरवले पाहिजे. योग्य वेळेत ठरवायला हवे की आपल्याला काय करायचे आहे आणि काय बनायचे आहे.

अनेक विद्यार्थी हे गावातून, आसपासच्या आदिवासी वाड्यातून येत असतात. बऱ्याच जणांची अभ्यास करण्याची प्रवृत्ती असते, क्षमता असते आकलन शक्ती उत्तम असते. शिकविणाऱ्याने फक्त शिकवू नये आणि समजून घेणाऱ्यानेही फक्त शिकू नये तर त्यांनी आकलन करावे. अभ्यासाची सगळ्यांची पद्धत वेगळी असते. पण नीट आकलन करून घेतले आणि त्यानंतर आपल्या पद्धतीने योग्य रितीने मांडले तर त्याचा फार उपयोग होतो. स्पर्धा परिक्षेत आधी आकलन महत्वाचे आहे आणि नंतर मांडणी, असेही जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी शेवटी सांगितले.

या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 3 प्रतींमध्ये पुस्तकांचे संच भेट म्हणून दिले. तसेच उद्घाटन समारंभानंतर तहसिलदार श्री.अक्षय ढाकणे यांनी यू.पी.एस.सी/एम.पी.एस.सी तयारीबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत केवळ दोनच दिवसात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 345 मुले आणि 494 मुली असे एकूण 839 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व दूरदृष्यप्रणालीद्वारे या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. याशिवाय या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्ह्यातून अधिक प्रतिसाद मिळाल्यास जिल्ह्यात अन्य तालुक्यांमध्येदेखील अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल, असा मानस जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांना पेण येथील या केंद्रावर हजर राहणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी ते राहत असणाऱ्या तालुक्यातील तहसीलमध्ये दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि.02 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन केंद्राचा निश्चितच लाभ होणार आहे.

प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी व रविवारी हे मार्गदर्शन केंद्र सुरू असणार आहे. या मार्गदर्शन केंद्रामध्ये शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या https://sites.google.com/view/bnasc-lib/home या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ते देत असणाऱ्या परिक्षेसंदर्भात माहिती, परिक्षेसाठी महत्वाच्या वृत्तपत्रांच्या लिंक्स आदि सुविधा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या केंद्रातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा raigadcomp@gmail.com या ईमेल वर अर्ज सादर करून या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

या कार्यक्रमाची प्रस्तावना लेखक आणि शिवचरित्र व्याख्याते श्री.प्रशांत देशमुख यांनी केली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसिलदार वैशाली काकडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here