टेमूर्डा येथील बँकेत दरोड्याचा प्रयत्न फसला
• भिंत फोडून बँकेत केला प्रवेश
• सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी टिव्ही लंपास
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
वरोरा, 9 डिसेंबर
चंद्रपूर-नागपूर राज्य महामार्गावर असलेल्या टेमूर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेची भिंत फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. पण, गावकर्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी टिव्ही व डीव्हीआर या वस्तूंवर मात्र त्यांनी हात साप करून पसार झाले. हा धक्कादायक प्रकार शुक्रवार, 8 डिसेंबर रोजी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आला.
टेमूर्डा येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. ही शाखा ग्रामपंचायत कार्यालयालगत आहे. शुक्रवारी रात्री ग्राम पंचायतची खिडकी फोडून दरोडेखोर ग्रामपंचायतीमध्ये घुसले. त्यानंतर त्यांनी बँक व ग्रामपंचायतला लागून असलेल्या भिंतीला छिद्र पाडले आणि बँकेत घुसले. त्यांनी बँक व्यवस्थापकांच्या कक्षात प्रवेश केला. पण, त्याचवेळेस कुत्रे भुंकल्याने नागरिकांना संशय आला आणि त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे हे दरोडेखोर पळून गेले. मात्र, ग्रामपंचायतमधील सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी टीव्ही व डीव्हीआरवर हातसाफ करुन पळून जाण्यास ते यशस्वी झाले.
याबाबतची माहिती पोलिस पाटील देवगडे यांना मिळताच त्यांनी इतरांना माहिती दिली. ग्रामपंचायत सदस्य विरुटकर व आगलावे हे काही गावकर्यांसह घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पळून गेले होते. रात्रीच पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून अज्ञात दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. स्वान पथक टेंभूर्डा येथून नागपूर दिशेने असणार्या पेट्रोल पंपापर्यंत जाऊन दोनदा परत आले. त्यामुळे चोरटे त्या ठिकाणाहून वाहनाने रवाना झाल्याचे मानले जात आहे.
• सातव्यांंदा दरोड्याचा प्रयत्न
8 मार्च 2006, 8 फेब्रुवारी 2015, जानेवारी 2019, डिसेंबर 2021 व 8 डिसेंबर 2023 मध्ये या बँकेत दरोड्याचा प्रयत्न झाला. डिसेंबर 2021 मध्ये बँकेत झालेल्या चोरीमध्ये चोरट्यांनी तिजोरी गॅस कटरने कापून रोख व सोने लंपास केले होते. चोरीसाठी चोरटे विशेषतः शुक्रवार या दिवसाचीच निवड करीत असल्याचे आजवर घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होते. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे नागपूर-चंद्रपूर मार्गलगत एटीएम आहे. हे एटीएम एक महिन्यापूर्वी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. या चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या चोरीमधील समावेश असलेले काही चोरटे अटक असल्याचे समजते. ही बॅक आतापर्यंत सातव्यांदा फोडण्याचा प्रयत्न झाला. सुचना देऊनही बँक प्रशासनाने सुरक्षा रक्षक नेमला नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.