लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फलदायी ठरल्याने महायुतीचे सरकार सत्तेवर आले. लाडक्या बहिणींमुळे मतदानाचा टक्कासुद्धा वाढला आहे. त्यामुळे महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेतील सहाव्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. शिवाय, महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार प्रतिमहिना 2,100 रुपये मिळण्याची वाट बघत आहेत, त्यामुळे आपल्या खात्यात पैसे कधी जमा होणार, याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे.
राज्यभरात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून आता थोड्याच दिवसांत सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजना या निवडणुकीत चांगलीच गाजली. महायुती व महाविकास आघाडीकडून सत्तेत आल्यास योजनेच्या पैशांत आणखी वाढ करण्याचे सांगितले जात होते.
आता राज्यात महायुतीची सत्ता आल्यामुळे आता लवकरात लवकर 2,100 रुपये मिळतील, अशी प्रतीक्षा लागली असून त्यासाठी आणखी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. तशा चर्चादेखील ठिकठिकाणी ऐकावयास मिळत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान; तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन जाहीर झालेल्या निकालात राज्यात भाजप हा सर्वांत मोठा पक्ष; तर त्यांचे महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षांना अनपेक्षित यश मिळाल्याने महायुतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. त्यात लाडकी बहीण योजना कार्ड चालल्याचे बोलले जात असून महिला त्यामुळे अधिकच खुश झाल्या आहेत. कारण, महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना प्रतिमाह दीड हजार रुपयांऐवजी 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांना आता त्या एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा लागली असून आगामी महिन्यापासून 600 रुपयांची वाढ त्यात होणार असल्याने सध्या महिला खूश आहेत.
आचारसंहितेच्या काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणुका संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. त्यामुळे आश्वासनपूर्तीकडे लाभार्थींचे लक्ष लागले आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने महिलांना 2,100 रुपये मिळणार का? दरम्यान, हा धोरणात्मक निर्णय असल्याने डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिल्यास तो 1,500 रुपयांप्रमाणेच दिला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विधानसभेपूर्वी महिलांनी अर्ज केले. त्यातील दोन कोटींहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभदेखील मिळाला. आता नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा 2,100 रुपये देणार आहे. तत्पूर्वी, योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणार्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर 1 एप्रिलपासून दरमहा दीड हजारऐवजी 2,100 रुपये दिले जाणार आहेत.
निकषांची होणार पडताळणी
1. योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का?
2. लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का?
3. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का?
4. परितक्त्या, विधवा, निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का?