अलिबागची तनिष्का वारगे राज्यस्तरीय क्रिकेट चाचणीसाठी निवड
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२५ अंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेसाठी अलिबाग तालुक्याची प्रतिभावान विद्यार्थिनी तनिष्का वारगे हिची निवड झाली आहे. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात सेंट मेरी ज्युनिअर कॉलेज, अलिबागची ही विद्यार्थीनी दमदार कामगिरीमुळे विशेष ठरली आहे.
राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचण्या अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. विभागीय पातळीवरील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तनिष्का वारगे हिने सरस खेळ करत राज्यस्तरीय निवडीपर्यंत मजल मारली आहे.
सेंट मेरी ज्युनिअर कॉलेज आणि हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, कॉलेजचे क्रीडा मार्गदर्शक यतीराज पाटील, प्राचार्य बेरिल मॅडम, तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अभिमान व्यक्त करत अभिनंदन केले आहे. शाळेतील शिस्तबद्ध प्रशिक्षण, कठोर सराव आणि सर्वांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांनी नवा क्रीडाआलेख रेखाटत शाळेचे नाव राज्य पातळीवर उज्वल केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे अलिबाग तालुका व रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची भावना व्यक्त होत असून, आगामी राज्यस्तरीय निवड चाचण्यांत तनिष्का कडून उत्तुंग कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









