सर्व ज्येष्ठ नागरिकांनी बुस्टर डोस घेण्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन, पालकमंत्र्यांनी स्वतः घेतला बूस्टर डोस; नागपूरमध्ये उत्तम प्रतिसाद
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016
नागपूर : – राज्याचे ऊर्जा मंत्री,तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज ज्येष्ठ नागरिक तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन कर्मचारी तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना द्यावयाच्या बूस्टर डोसचा स्वतः लाभ घेतला. जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
लसीचे दोन डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन कर्मचारी, तसेच 60 वर्ष व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना मात्रा घेतल्याच्या तारखेपासून नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास 10 जानेवारीपासून प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र ठरू शकतात. अशा नागरिकांना शासनामार्फत मोबाईल वर मेसेज जात आहे. या सर्वांना हा बूस्टर डोस दिला जाणार आहे.
नागपूर येथील पाचपावली प्रसूती रुग्णालयात सकाळी 11 वाजता नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, राम जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक आयुक्त अभिजीत बावीस्कर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे डॉ.ममता तळेकर, वैद्यकीय अधिकारी प्रिया वासनिक,हितेशी मेश्राम उपस्थित होते.
ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीने सुविधा उपलब्ध
फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने कोविन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही, फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असे मनपाच्या वतीने कळवण्यात आले आहे. सर्व नागरिकांचे शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होईल.
१५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना आवाहन
सध्या कोव्हिड नियमावलीमुळे शाळा १५ जानेवारी पर्यंत बंद करण्यात आल्या. त्यामुळे सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व १५ ते १७ वर्षापर्यंतचे विद्यार्थ्यांनी २८ कोव्हॅक्सीन लसीकरण केन्द्रांवर जाऊन लसीकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापनाने पूढाकार घेऊन आपल्या विद्यार्थ्यांकरीता आपल्या शाळेत लसीकरण व्हावे यासाठी त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क करावा व १०० टक्के पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात-लवकर पूर्ण करावे.