युवकांसाठीचे प्रेरणास्थान म्हणजे स्वामी विवेकानंद !

ह.भ.प.डॉ.वीणा त्या. खाडिलकर,

मो: 8779338562

मुंबई: इंग्रजांचे वर्चस्व असताना भारतभूमी व हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन, धन व प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्‍ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्‍न म्हणजे स्वामी विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत व वेदान्तमार्गी राष्ट्रसंत इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेल्या तेजस्वी व ध्येयवादी व्यक्‍तीमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंदआहे. हिंदू धर्माचे शिवधनुष्य पेलणे हे सामान्य कार्य नाही. ते नक्कीच अतुलनीय असे सेवाभावी कार्य आहे. 

हिंदू धर्म ही एक अत्यंत विशाल, सर्वसमावेशक, सहिष्णू अशी जीवनप्रणाली आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती स्वामी विवेकानंदांच्या सहवासात, त्यांच्या व्याख्यानात, त्यांच्या आचरणात पाश्चिमात्य लोकांनी घेतली. सहिष्णुता हा हिंदूंचा स्वभाव आहे. यामुळेच आजही पूर्ण जगात हिंदू धर्मीयांवर सर्वाधिक विश्वास ठेवला जातो. हिंदू संस्कृतीचे जगाला असलेले आकर्षण हेच दर्शवते की विविध परंपरांनी नटलेल्या या देशात साजरे होणारे सण – उत्सव ऊर्जा प्रदान करणारे असतात. हा केवळ एक भाग आहे. हिंदू धर्मात किडा मुंगी – मनुष्य यांसह निर्जीव वस्तूंचाही बारकाईने विचार केला आहे. अनंताचे ज्ञान या धर्मात सामावलेले आहे. स्वामी विवेकानंदांनी ऐन तारुण्यातच हिंदू धर्माच्या अभ्यासाविषयी घेतलेली झेप लक्षवेधी आहे. कारण त्या वयातील तरुण, तरुणी मौजमजा आणि स्वतःला वाटेल त्या प्रकारे जीवन जगण्याला प्राधान्य देतात. कोणाची बंधने नको असतात. एक युवक अभ्यासपूर्णपणे हिंदू धर्म आणि भारतीय तत्त्वज्ञान यांविषयी अभ्यासपूर्ण बोलतो म्हणजे ही व्यक्ती आणि हा मांडत असलेला विषय यांच्याविषयी कुतूहल निर्माण होणे आलेच. यामुळे त्या वेळी जगाला हिंदू धर्म आणि भारतीय तत्त्वज्ञान यांची स्वामी विवेकानंद यांच्या ओजस्वी वाणीमुळे ओळख झाली. हे मान्य करावे लागेल.

ह. भ. प. डॉ. वीणा त्यागराज खाडिलकर

हिंदू धर्म म्हणजे काय ? , भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे काय ? याची आधी नीट कल्पना नसणाऱ्या विदेशी मंडळींत यांविषयी जिज्ञासा निर्माण होते. तिथे जन्मत : हिंदू असणाऱ्या कैक हिंदूंना हिंदू धर्म जाणून घेणे आणि त्यानुसार आचरण करणे सहज शक्य आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. जन्माने हिंदू असणे, त्यातही भारतात निवास असणे म्हणजे या पुण्य भूमीत निवास असणे म्हणजे भाग्यच आहे. दैनंदिन जीवनात विविध क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी शिकल्या जातात. त्यासह हिंदू धर्म जाणून घेतला तर या महान धर्मात किती अगाध तत्त्वज्ञान सामावलेले आहे याची माहिती होईल आणि आपल्याकडून ती पुढच्या पिढीला दिली जाईल. साखरेचा गोडवा चाखल्याशिवाय तिची गोडी कळत नाही. विदेशांत हिंदू धर्माचे आकर्षण वाढत आहे. संस्कृत, योग साधना यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ते शिकून त्यातील माहिती समजून घेतली जात आहे. 

‘माझ्या अमेरिकन बंधू-भगिनींनो’ अशा अत्यंत आत्मीयतेच्या भावपूर्ण शब्दांनी स्वामीजींनी शिकागो धर्मपरिषदेतील त्यांच्या व्याख्यानाची सुरुवात केली आणि संपूर्ण सभागृह जिंकून घेतले. त्यानंतर अमेरिकेत आणि संपूर्ण युरोप खंडात स्वामी विवेकानंदांची शेकडो व्याख्याने झाली. भारतीय तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्व युरोपियन लोकांच्या लक्षात आले. स्वामीजींच्या ज्वलंत उपदेशाने प्रेरित झालेले शेकडो युवक, युवती, देशविदेशातील अनाथ, निराश्रित पीडितांची, गोरगरिबांची सेवा करायला लागले. अनेक विदेशी स्त्री-पुरुषांनी स्वामीजींची दीक्षा घेतली आणि त्यांच्या कार्याला वाहून घेतले. मानवतेच्या सेवेतच परमार्थाचे फलित सामावलेले आहे, या नव्या विचाराचे वारे संपूर्ण जगात वाहायला लागले. मॅक्सम्युलर आणि पॉल डायस, मागरिट नोबल (भगिनी निवेदिता) सारख्या अनेक पाश्चिमात्य विद्वानांना व विदुषींना स्वामीजींच्या महान तत्त्वज्ञानाने अनुग्रहित केले. 

एका भेटीत नरेंद्रने म्हणजेच स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांना विचारले, “आपण ईश्वर पाहिला आहे का?’ रामकृष्णांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “होय, मी ईश्वर पाहिला आहे आणि तुझी इच्छा असेल तर मी तुलादेखील ईश्वरदर्शन घडवू शकतो.” नरेंद्रच्या प्रश्नाला एवढे आश्वासक उत्तर यापूर्वी कुणीही दिले नव्हते. नरेंद्र पहिल्यांदाच रामकृष्णांच्या समोर नतमस्तक झाला. त्याची मन:स्थिती रामकृष्णांनी ओळखली होती; पण त्याच्या घरची त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता रामकृष्णांनी त्याला घरी परत जाण्याची आज्ञा केली. त्यानंतर अधून-मधून रामकृष्ण आणि नरेंद्र यांचा भावनिक, आध्यात्मिक संवाद चालू असायचा. ईश्वरदर्शनाची नरेंद्रची व्याकुळता, मनाची विकलता लक्षात घेऊन स्वामी रामकृष्णांनी एके दिवशी नरेंद्राला ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती दिली. एका आगळ्या-वेगळ्या चैतन्याचा अनुभव नरेंद्रला त्यावेळी आला. त्याची उत्कटता पाहून रामकृष्णांनी त्याला प्रत्यक्ष कालीमातेचे दर्शन घडविले .

“उठ भवानी त्रीभुवन जननी आदिनारायणी ।

तुझ्या दर्शना आतुर झालो भक्त सिद्ध ज्ञानी।

 एके दिवशी नरेंद्र रामकृष्णांना म्हणाला, “गुरुदेव माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी धन आणि सौख्य देण्याची प्रार्थना कालीमातेला करा.” त्यावर रामकृष्ण म्हणाले, “तू स्वत:च तुला पाहिजे असेल ते माग.” नरेंद्र कालीमातेसमोर हात जोडून ध्यान लावून बसला आणि कालीमातेचे दिव्य रूप पाहताच त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, “हे माते, मला ज्ञान, विवेक आणि वैराग्य दे.’ हाच प्रकार तीन वेळा घडला. त्याच्या अंतर्मनाला जे हवे होते तेच त्याच्याकडून मागितले जात होते. स्वामी रामकृष्णांनी त्याला आश्वस्त केलं, “अरे, तू मातेचा खरा भक्त आहेस. माता तुला कधीही कमी पडू देणार नाही.”

जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी जुलै 1890 मध्ये भारतभ्रमणास सुरुवात केली. स्वामी विवेकानंदांची ही भारतयात्रा अनेक अद्भुत घटनांनी, असंख्य बोधप्रद प्रसंगांनी, अनेक ज्ञानयज्ञांनी भरलेली आहे. स्वामी विवेकानंदांनी “उठा, जागे व्हा आणि अंतिम ध्येय साध्य होईपर्यंत ध्येयपथावर चालत राहा, थांबू नका.” हा संदेश भारतीय तरुणांना दिला. भारतीय युवक आणि युवतींना सदैव जागृत असणे म्हणजे सतर्क असणे अत्यावश्यक आहे. म्हणून या वीर विद्वान ज्ञानयोगीस म्हणावेसे वाटते 

“जयतू विवकानंदस्वामी जयतू वीर संन्यासी।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here