मीडिया वार्ता न्यूज़
ठाणे- खुनाच्या गुन्ह्यात पुण्यातील येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक कैदी १४ दिवसांच्या पॅरोलवर कारागृहातून सुटला. मात्र नंतर कारागृहात परतलाच नाही. त्याचा शोध एक-दोन वर्षांनंतर नव्हे, तर तब्बल १७ वर्षांनंतर लागला असून ठाणे गुन्हे शाखा युनिट १ने या कैद्याला उत्तर प्रदेशमधून अटक केली.
वेदप्रकाश वीरेंद्र सिंह (४८) असे या कैद्याचे नाव आहे. स्थावर मालमत्तेच्या वादातून रामनारायण खरबानी सिंग (रा. करावालोनगर ठाणे) यांची शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना ५ डिसेंबर १९९४ रोजी घडली. या प्रकरणी प्रयागसिंग भारती सिंग, वेदप्रकाश सिंग आणि अशोककुमार सिंग यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे सत्र न्यायालयाने १९९७मध्ये आरोपींना जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. वेदप्रकाश हा पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना १८ जून २००१मध्ये त्याला १४ दिवसांची पॅरोल रजा मिळाली. त्यामुळे तो कारागृहातून बाहेर पडला. मात्र रजा संपल्यानंतर कारागृहात परतलाच नाही. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. हा कैदी उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमध्ये असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट १चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशला पोहोचले. उत्तर प्रदेशच्या टास्क फोर्सची मदत घेऊन गुन्हे शाखेने वेदप्रकाशला बुधवारी अटक केली.
वेदप्रकाश हा मूळचा सुलतानपूरचा राहणारा असून तो या ठिकाणी लपून बसला होता. तसेच उत्तर प्रदेशला चष्म्याचे दुकान सुरू केले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ठाकरे यांनी दिली. त्यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, पोलिस हवालदार भिलारे, सुनील जाधव, पोलिस नाईक संभाजी मोरे, शिवाजी गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.