मीडिया वार्ता न्यूज़
मुंबई- चोर-पोलिसांचा खेळ नेहमीच रंगत असताना भोईवाडा पोलिस ठाण्याने चोरीप्रकरणी पोलिस शिपायाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या पोलिसाने यापूर्वीही टपाल विभागात नोकरी मिळवून देण्याचा बहाणा रचून एका व्यक्तीची ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती. त्याप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.
मुंबई पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात असणाऱ्या अरुण पवारविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पवारने अन्य पोलिस शिपायाच्या घरातून एक लाख रुपयांवर रोख रक्कम चोरली होती. ती रक्कम परत करण्यात हयगय करणाऱ्या पवार यास शेवटी पोलिसी हिसका दाखवण्यात आला.
नायगावमधील बीडीडी चाळ क्रमांक ११/ब मध्ये हिरालाल पाटील राहतात. त्यांच्यासोबत सतीश पाटील हे अन्य शिपाईही राहतात. काही महिन्यांपूर्वी सतीश पाटील यांचे मित्र असणारे अरुण पवार आणि गोरखनाथ शिखरे हे दोघे त्यांच्या घरी आले होते. तेव्हा संधी साधून पवारने हिरालाल पाटील यांच्याकडील एक लाख २० हजार रुपयांची रक्कम चोरली. अशाप्रकारे चोरी करू नये, असे परोपरीने समजावण्याचा प्रयत्न शिखरे यांनी केला. पण पैशाच्या मोहात अडकलेल्या पवारने त्यांचा सल्ला ऐकला नाही. चोरीचा प्रकार समोर येताच वरिष्ठांनीही ही सर्व रक्कम परत कर, अशी सूचना केली. पण, ते ऐकण्यापलीकडे गेलेल्या पवारविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.