वडगाव प्रभागातील एक करोड घोटाळ्याबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना 7 दिवसांत दिले चौकशी करण्याचे आदेश
आम आदमी पार्टीने पुढे आणला होता निविदा घोटाळा
*प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684/7507334809
चंद्रपूर : प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गैरव्यवहार संदर्भात चर्चेत असलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील 1 करोड रूपयाच्या निविदेच्या चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
पूर्वीच बांधकाम झालेल्या कामाची निविदा काढून पुन्हा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील या संशयास्पद प्रकरणासंदर्भात आम आदमी पार्टीने विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.
महानगरपालिका हद्दीतील वडगाव प्रभाग व भानापेठ प्रभाग येथील कॉक्रीट रस्ते, नाल्या, कंपाउंड वाल, पेव्हींग ब्लॉकचे काम, फर्नीचर व पेंटींगचे काम आदी कामांची नविन निविदा १० जानेवारी २०२२ ला काढण्यात आली. तशी रीतसर निविदा जाहीरात वृत्तपत्राला देण्यात आली. सदर कामे ही जवळपास करोड रुपयांची आहे. या कामांसाठी कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. मात्र वास्तविक ही सर्व कामे याअगोदरच झालेली आहेत. तरी या कामांची नविन निविदा जाहीरात काढून महानगरपालिकेने उघड उघड भ्रष्टाचाराचा घाट घालून जनतेच्या करातून गोळा केलेले एक करोड रुपये खिशात घालण्याचा प्रताप सुरु केला आहे.
या निविदा जाहीरातीची व सदर कामांची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केली होती. त्यानंतर तातडीने महानगरपालिकेने सदर निविदा रद्द करून गैरव्यवहारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात आयुक्तांची भुमिका संशयास्पद आहे. आम आदमी पार्टीने या विरोधात महानगरपालिकेसमोर निषेध नोंदविला होता.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसाच्या आत अहवाल व अभिप्राय सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हे आदेश नगरपरिषद प्रशासन चे प्रादेशिक आयुक्त संघमित्रा ढोके यांनी जारी केले आहेत. या चौकशी अंती महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे भ्रष्टाचाराचे पितळ उघडे होईल, असे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष सुनील मुसळे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.यावेळी कोषाध्यक्ष भिवराज सोनी युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार महानगर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार शहर सचिव राजू कुडे एडवोकेट सुनिता पाटील एडवोकेट राजेश विरानी सूर्यकांत चांदेकर तथा इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.