माजी खा. अशोक नेते यांना ‘डॉक्टर ऑफ सोशल वर्क’ पदवी प्रदान

माजी खा. अशोक नेते यांना ‘डॉक्टर ऑफ सोशल वर्क’ पदवी प्रदान

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994

गडचिरोली : -राजकारण, समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रात समतोल साधत समाजाच्या सर्वांगिन प्रगतीसाठी सतत कार्यरत असणारे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांना साउथ-वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी (युएसए) तर्फे ‘डॉक्टर ऑफ सोशल वर्क’ या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले.

9 मार्चला गोवा येथील ‘द क्राउन हॉटेल’ येथे आयोजित समारंभात त्यांना ही उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या शैक्षणिक समितीने त्यांना स्मृतिचिन्ह, अधिकृत पदवी प्रमाणपत्र आणि विशेष मानचिन्ह प्रदान करून गौरविले. नेते यांच्यासह देशभरातील समाजाच्या प्रगतीसाठी विशेष योगदान देणाऱ्या 30 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

दोन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार म्हणून जबाबदारी पार पाडताना नेहमी समाजाला केंद्रस्थानी ठेवून कार्यरत राहिलो. सर्वांगीण विकासाच्या दृष्टिने नवीन गोष्टी करता आल्या. या सन्मानामुळे समाजासाठी कार्यरत राहण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया अशोक नेते यांनी व्यक्त केली.

त्यांच्या या सन्मान सोहळ्याला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भरत खटी, मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, अजय सोनुले, दिवाकर गेडाम आदी उपस्थित होते. या सन्मानाबद्दल माजी खा. नेते यांच्यावर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.