भारत सौदी करार ; पाकला धक्का

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

सध्या पाकिस्तान चारही बाजूने कोंडीत सापडला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याने महागाई गगनाला भिडली आहे. महागाईमुळे जनतेला एक वेळेचे पुरेसे अन्न मिळणेही मुश्किल झाले आहे. केवळ अर्थव्यवस्थेबाबतच पाकिस्तानची अशी अवस्था आहे असे नाही तर संरक्षण क्षेत्रातही पाकची तीच अवस्था आहे. अशावेळी पाकिस्तानला जगात दोनच देशांकडून अपेक्षा आहे १ ) चीन आणि २ ) सौदी अरेबिया. हे दोन देश पाकिस्तानचे मित्र देश आहेत. ज्या ज्या वेळी पाकिस्तान संकटात सापडतो त्या त्या वेळी या दोन देशांनी पाकिस्तानला मदत केली आहे.

सौदी अरेबिया हे मुस्लिम राष्ट्र असून पाकच्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहिले आहे. या आधी सौदी अरेबियाने पाकला अनेकदा आर्थिक रसद पुरवली आहे. मात्र यावेळी आर्थिक संकटात सापडलेल्या पाकला आर्थिक मदत पुरविण्यास सौदी अरेबियाने साफ नकार दिला आहे त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच सौदी अरेबियाने पाकला आणखी एक जबर धक्का दिला आहे. भारत आणि पाक वादात सौदी अरेबियाने नेहमी पाकची बाजू घेतली आहे मात्र काही दिवसांपूर्वी भारत आणि सौदी अरेबियात एक करार झाला. भारताची इंटेलिजन्स एजन्सी रिसर्च अँड एनालायसिस विंग ( रॉ ) यांच्यात एक करार झाला आहे. या करारात असे ठरवण्यात आले आहे की भारताच्या दहशतवाद विरोधी मोहिमेत सौदी अरेबिया भारताला सर्वोतोपरी मदत करेल. या कराराला आता सौदी अरेबियाच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सौदी अरेबियाच्या मंत्रिमंडळाने या कराराविषयी एक निवेदन नुकतेच सादर केले असून या निवेदनात सौदी अरेबियाने म्हटले आहे की दहशतवादी घटना आणि दहशतवादाला मिळणारी आर्थिक रसद रोखण्यासाठी सौदी सुरक्षा एजन्सी रॉ सोबत काम करेल. या संपूर्ण कराराची माहिती सौदी गॅझेटने अधिकृतपणे दिली आहे.

या राजपत्रानुसार सौदीचे राजे सलमान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने या कराराला मंजुरी दिली आहे. पाकिस्तानसाठी हा खूप मोठा धक्का समजला जातो. पाकिस्तानने या करारावर अद्याप प्रतिक्रिया दिली नसली तरी पाकिस्तानला या कराराचा मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्रविषयक तज्ज्ञानी मात्र हा करार ऐतिहासिक असून हा करार म्हणजे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचे अपयश असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी ज्या ज्या वेळी काश्मीर मुद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित झाला त्या त्या वेळी सौदी अरेबियाने पाकिस्तानची बाजू घेतली होती. भारताने मात्र पाकिस्तान हीच दहशतवादाची फॅक्टरी असल्याचे ठामपणे सांगितले इतकेच नाही तर पाकिस्तानचे अनेक दहशतवादी सौदी अरेबियात असून सौदीने जर पाकला पाठिंबा दिला तर सौदी अरेबियाला देखील भविष्यात दहशतवादाला सामोरे जावे लागेल असे सौदी अरेबियाला सांगितले होते आता सौदी अरेबियाला भारताचे हे म्हणणे पटले असल्याचे दिसून येत आहे म्हणूनच सौदी अरेबियाने आता दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला साथ देण्याचे ठरवले आहे.

भारताच्या दृष्टीनेही हा ऐतिहासिक करार आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत सौदी अरेबियाची भारताला साथ मिळणे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मोठा विजय समजला जात आहे. शिवाय आखाती देशातील सर्वात मोठा मुस्लिम देश भारताच्या बाजूने उभा राहत आहे ही घटना भारताच्या आणि पाकिस्तानच्याही परराष्ट्र धोरणावर दूरगामी परिणाम करणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here