नागपुर जिल्हात खेळत असताना 2 वर्षाचा चिमुकला पडला बोअरवेलमध्ये.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.10 जुन:- नागपूर जिल्हातील रामटेक तालुक्यातील शिवणी भोंडकी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवणी भोंडकी परिसरात खेळत असतांना एक दोन वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला यांची माहिती गावक-यांना मिळताच सगळ्यांचा श्वास एका क्षणासाठी थांबला होता. या दोन वर्षाच्या चिमुकल्याच काय होईल अशा विचार सतत त्याच्या परीवर आणि गावातील नागरीकाना पडला होता. बालक सुखरूप बाहेर निघावे, इवल्याशा जिवाचे काही बरेवाईट होऊ नये, यासाठी परिसरात सुरू झाल्यात दुवा व प्रार्थना. परंतु, प्रसंगावधान साधून गावकऱ्यांनी बाळास मोठ्या शिताफीने सुखरूप बाहेर काढले.
बाळाला पाहिल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. नवघान देवा दोंडा वय 2 वर्ष असे चिमुकल्याचे नाव. नवघानचे वडील गुराखी असून, ते शिवारात जनावरे चारत होते. त्यांच्यापासून काही अंतरावर छोटीछोटी मुले खेळत-बागडत होती. खेळता खेळता शेतातील एका बोअरवेलच्या खड्ड्यात चिमुकला नवघान पडला. त्यामुळे इतर मुले रडायला लागली. मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून वडील धावपळ करीत घटनास्थळी पोचले. हे दृश्यी पाहून आई-वडिलांनी तर हंबरडाच फोडला. त्यांचा आक्रोश ऐकून गावातील लोक घटनास्थळी दाखल झाले. जवळपास अर्धा तासापासून ते बाळ बोअरवेलच्या खड्ड्यात अडकले होते. गावातील रक्षक क्रिष्णा पाटील, यादोराव शेंडे, शंकर शेंडे, महादेव पाटील, अमोल वैद्य, अक्षय गभणे ही मंडळी लगबगीने घटनास्थळावर पोहोचली. बोअरवेलला पाणी न लागल्याने शेतकऱ्याने तो खड्डा तसाच उघडा ठेवला होता. बाळास बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. कोणीतरी ‘टॉर्च’ लावून बाळाशी संपर्क साधला. पन्नास फूट खोलवर असलेल्या बोअरवेलच्या खड्ड्यात दोर टाकला. बाळास दोर पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या. अखेर मोठ्या शिताफीने बाळास सुखरूप बाहेर काढण्यात आले. अर्धा तास शर्थीचे प्रयत्न चालले. याबाबतची कल्पना प्रशासनास नव्हती. मात्र, गावकऱ्यांनी मोठ्या हिमतीने प्रसंगाला तोंड दिले. बोलावलेले जेसीबी येण्यास उशीर झाला. अखेर मोठ्या हिमतीने बाळास सुखरूप बाहेर काढण्यास यश आलेले पाहून गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.