गणेशोत्सवानिमित्त भिवंडी मनपाच्या आयुक्तांची विविध यंत्रणांसोबत समन्वय बैठक पार पडली

गणेशोत्सवानिमित्त भिवंडी मनपाच्या आयुक्तांची विविध यंत्रणांसोबत समन्वय बैठक पार पडली

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

भिवंडी : आगामी गणेशोत्सवानिमित्त आयुक्तांची विविध यंत्रणांसोबत समन्वय बैठक दिनांक २७/०८/२०२५ ते दिनांक ०६/०९/२०२५ या कालावधीत गणेशोत्सव सण साजरा होणार आहे. यासाठी मा. प्रशासक तथा आयुक्त श्री अनमोल सागर (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील गणेशोत्सव संबंधित विविध यंत्रणाची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये बांधकाम विभाग, विद्युत विभाग, प्रभाग समिती क्रमांक १ ते ५ व पोलीस यंत्रणा यांनी गणेश आगमन व विसर्जन मार्गाची संयुक्त पाहणी करून आवश्यक असणाऱ्या उपाय योजनांची माहिती तात्काळ सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले. शहरात ज्या ज्या ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत अशा कृत्रिम तलावांची जागा निश्चित करणे तेथे आवश्यक सुविधांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शहरातील सर्व गणेश मंडळांच्या मंडपाच्या ठिकाणी व विसर्जन घाटांजवळ दररोज स्वच्छता करणे व त्या ठिकाणी जंतुनाशक व दुर्गंधीनाशक औषध फवारणी करणे. सर्व विसर्जन घाटांवर तसेच कृत्रिम तलावाशेजारी निर्माल्य कलशाची व्यवस्था करणे असे निर्देश दिले. तसेच गणेशोत्सव काळात शहरातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना टोरेंट पावर लिमिटेड देण्यात आल्या आहेत.
प्रभाग निहाय कृत्रिम तलाव उभारून, त्याच ठिकाणी मूर्ती स्वीकार केंद्र देखील सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त कृत्रिम तलावामध्ये मूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन आयुक्तांनी केले. पोलीस विभागाने देखील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. प्रभाग अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रभागात तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, सोसायट्यांचे पदाधिकारी यांच्याशी वेळोवेळी बैठका घेऊन अथवा समन्वय साधून त्यांना गणेश मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास प्रोत्साहित करावे असे निर्देश दिले.
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांपैकी जी मंडळे पर्यावरणपुरक गणेश मूर्ती, प्लास्टिकरहित सजावट, जास्तीत जास्त पुनर्वापर होणाऱ्या साहित्याचा वापर करतील, तसेच शासकीय नियमांचे आणि शिस्तीचे पालन करतील अशा मंडळांची पाहणी करून त्यातील प्रथम तीन विजेत्या मंडळांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले. याकरिता एक समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे.
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
सदर बैठकीस मा.अतिरिक्त आयुक्त श्री. विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त पोलीस (भिवंडी पूर्व) श्री. सचिन सांगळे, उपायुक्त (मुख्यालय) श्री. विक्रम दराडे, उपायुक्त (कर) श्री. बाळकृष्ण क्षिरसागर, मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री. रामप्रसाद साळुंखे, शहर अभियंता श्री. जमील पटेल, भिवंडी वाहतूक विभाग श्री. अनंता वाघ, टोरंटो पॉवर लिमिटेडचे व्यवस्थापक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.