गोंधळपाडा शाळेत मोफत नेत्र तपासणी शिबिर
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- ताज हॉटेल, वेश्वी ग्रामपंचायत आणि इंडियन हॉटेल कंपनीच्या ‘पाथ्य’ उपक्रमातून गोंधळपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन दिवशीय मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन गोंधळपाडा येथील ताज हॉटेलचे जनरल मॅनेजर अनंत गडाला आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
इंडियन हॉटेल कंपनीने “पाथ्य” नावाचा एक व्यापक उपक्रम सुरू केला आहे. हा ‘पाथ्य’ शब्द संस्कृतमधील ‘पथ्य’ या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ ‘मार्ग’ किंवा ‘पथ्य आहार’ (जे आरोग्यासाठी योग्य आहे) असा होतो. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवणे आणि एक चांगले भविष्य घडवण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केले जात आहेत. सध्या शाळकरी विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांमध्ये मोबाईलच्या वाढत्या सवयीमुळे डोळ्याच्या संदर्भात अनेक समस्या उद्भवत आहेत. याचे निराकरण करणे हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. यावेळी बोलताना कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक किशोर रानवडे यांनी सांगितले की, इंडियन हॉटेल कंपनीने ‘पाथ्य’ उपक्रमातून पर्यावरणाची काळजी घेणे, पर्यावरणाचे संरक्षण आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यामध्ये ऊर्जा कार्यक्षमता, पाणी वाचवणे, कचरा व्यवस्थापन, आणि प्लास्टिकचा वापर कमी करणे यांचा समावेश आहे. यात लोकांना आणि स्थानिक समाजाला सक्षम करणे हे मुख्य ध्येय आहे. कौशल्य विकास, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन आणि सामुदायिक सेवा यांचा समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती किशोर रानवडे यांनी दिली. ९ आणि १० जुलै अशा दोन दिवसांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर ताज हॉटेल आणि ग्रामपंचायत वेश्वी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिराचे सकाळी उद्घाटन झाले. शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांची मोफत तपासणी केली गेली. सदर शिबिरास ताज हॉटेलचे जनरल मॅनेजर अनंत गडाला, सुरक्षा आणि सुरक्षितता अधिकारी किशोर रानवडे, एक्झिक्युटिव्ह अधिकारी चेतन विभांडीक तसेच अशोक प्रियदर्शनी, कुशल घुगे उपस्थित होते. शिबिरासाठी अत्यंत कुशल अशी डॉक्टरांची टीम उपस्थित होती. शिबिराचे आयोजक ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश गावडे, तसेच सदस्य उद्धव भितळे, प्रसाद गोतावडे उपस्थित होते, तसेच ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.