कर्नाकचा काळा इतिहास कायमचा पुसला
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.१०, मुंबई : मुंबईतील बहुचर्चित आणि बहू प्रतीक्षित अशा ऐतिहासिक कर्नाक पुलाचे म्हणजेच ऑपरेशन सिंदूर पुलाचे उदघाट्न आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांना असलेली कर्नाक पुलाची प्रतीक्षा आता संपली असुन सिंदूर पुल असे या पुलाचे नामकरण देखील करण्यात आले आहे.
उदघाट्न प्रसंगी पुलाचे नाव बदलण्यामागचं कारण सांगताना मुख्यमंत्र्यांनी कर्नाक नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या जुलमी आणि अत्याचारी वृत्तीचा उल्लेख केला. तसेच प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेल्या इतिहासातील संदर्भ देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गेली दीडशे वर्ष या पुलाला क्रूर कर्मा कर्नाकच्या नावानेच ओळखले जात होते. भारतीयांवर अन्याय करणारा आणि स्वकीय जनतेला फसविणाऱ्या या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या इतिहासातील काळ्या खुणा कायमच्या पुसून टाकण्यासाठी या कर्नाक पुलाचे सिंदूर असे नामकरण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
तसेच नुकतेच भारताने पाकिस्तान विरुद्ध राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला समर्पित करत या उड्डाणपुलाचे नाव सिंदूर ठेवण्यात केल्याचेही त्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डी’ मेलो मार्गाला जोडणाऱ्या या सिंदूर रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहासातील अशी काळी प्रकरणे संपली पाहिजेत, त्याच्या खुणा मिटल्या पाहिजेत असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याने कर्नाक पुलाचे नाव बदलले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात जाऊन दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारत पाकिस्तानात घुसून दहशदवादी अड्डे उद्धवस्त करू शकतो, हे दाखवून दिले. या सेनेच्या अतुलनीय कामगिरीमुळे सर्वांच्या मते मनपाने पुलाला सिंदूर नाव दिले, याचा मला आनंद आहे. या पुलाची एकूण लांबी ३४२ मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी असल्याने निश्चितच मुंबईतल्या वाहतुकीसाठी पूल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
रेल्वेवरचा पूल असल्याने आणि दाटीवाटीच्या अडचणीवर मात करून मुंबई मनपाने कमी वेळात ऐतिहासिक जुन्या कर्नाक पुलाचे उत्कृष्ट बांधकाम केल्याने मुख्यमंत्र्यांनी मनपाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. शिवाय सिंदूर पूल मुंबईकरांना समर्पित करीत दुपारी ३.०० वाजेपासून वाहतुकीला खुला होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केले.
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर पूल महत्त्वाचा आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार सिंदूर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.
मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी. डी’ मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा. पुलाच्या पुनर्बांधणीमुळे सुमारे १० वर्षापासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार. पूल कार्यान्वित झाल्यावर पी डी’ मेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. पुलाच्या पुनर्बांधणीने युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक सुलभ होणार आहे.