टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा लेखाजोखा.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने जिंकली १ सुवर्ण, २ रौप्यपदक, ४ कांस्यपदक. काही खेळाडूंनी इतिहास घडविला, तर काहींच्या पदरी निराशा पडली

indian players in tokyo olympic
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा लेखाजोखा.

 

मुंबई

मनोज कांबळे दि. ११ ऑगस्ट २०२१: टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा नुकतीच पार पडली. जगभरातल्या २०६ देशांच्या ११०९० खेळाडूंनी या ऑलीम्पिकमध्ये भाग घेतला होता. यामध्ये भारताच्या १२६ खेळाडूंचा समावेश होता. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोविड पँडेमिक, लॉकडाऊन, अपुरा सराव आणि क्वारंटाईन सारख्या समस्यांचा सामना करत भारतीय खेळाडूंनी भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काहींनी इतिहास घडविला, काहींच्या पदरी निराशा पडली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा लेखाजोखा पाहूया:

टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते भारतीय:

नीरज चोप्रा (२३ वर्षीय) – सुवर्णपदक – भालाफेक –
राज्य: हरियाणा
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक मध्ये भालाफेकीमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. आधुनिक ऑलिम्पिकच्या शंभराहून जास्त वर्षांच्या इतिहासातील एथलेटिक्स मधील भारताचं हे पाहिलं सुवर्णपदक होत. हे पदक जिंकण्यासाठी नीरज चोप्राने ८७.५० मीटर्स लांबीवर भाला फेकला होता. पदक जिंकल्यानंतर भावुक झालेल्या २३ वर्षीय नीरज चोप्राने आपलं ऐतिहासिक सुवर्णपदक दिवंगत धावपटू मिल्खा सिंग याना समर्पित केलं होत.

मीराबाई चानू (२७ वर्षीय) – रौप्यपदक – वेट-लिफ्टिंग
राज्य: मणिपूर
मणिपूरची मीराबाई चानू. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला पराभव पत्करावा लागला होता. पण चार वर्षाच्या अथक परिश्रमानंतर २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने २०२ किलो ( ८७+११५) वजन उचलत रौप्यपदक जिंकलं. वेट-लिफ्टिंग मध्ये रौप्यपदक जिंकणारी ती एकमेव भारतीय खेळाडू आहे.

रवी कुमार दहिया (२३ वर्षीय) – रौप्यपदक – कुस्ती
राज्य: हरियाणा
रवीकुमार दहिया कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर होता. परंतु पदकाच्या सामन्यांमध्ये रशियन कुस्तीपटू कडून त्याला ७-४ ने पराभव पत्करावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. या पदकाबरोबर कुस्तीमध्ये सलग चौथ्या ऑलीम्पिकमध्ये पदक जिंकण्याची भारताची परंपरा कायम राहिली आहे.

पी व्ही सिंधू (२६ वर्षीय) – कांस्यपदक – बॅडमिंटन
राज्य: हैदराबाद
२०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या पी.व्ही. सिंधूवर टोकियो ऑलिम्पिक सुरु होण्या आधीपासूनच साऱ्यांची नजर होती. टोकियो ऑलीम्पिकमध्ये चायनाच्या हि बिंगला या खेळाडूला स्ट्रेट सेटमध्ये हरवत पी.व्ही सिंधूने कांस्यपदक जिंकले. याबरोबरच सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडूचा मान तिने मिळवला आहे.

लवलिना बोर्गोहेन (२३ वर्षीय) – कांस्यपदक – बॉक्सिंग
राज्य: आसाम
२३ वर्षाच्या लवलिना बोर्गोहेनने आपल्या पहिल्या ऑलीम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. मुये थाई या बॉक्सिंग प्रकारच्या सरावापासून पहिल्या-वाहिल्या ऑलिम्पिक पदकापर्यंतचा लवलिना बोर्गोहेननेचा प्रवास भारतीय क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे.

बजरंग पुनिया (२७ वर्षीय) – कांस्यपदक – कुस्ती
राज्य: हरियाणा
पहिलंच ऑलिम्पिक खेळणाऱ्या हरियाणाच्या बजरंग पुनियाला सेमी-फायनलमध्ये पराभव पत्करावा लागलं होता. परंतु पराभवाने निराश न होता कांस्यपदकच्या लढतीत त्याने कझागस्तानच्या कुस्तीपट्टूचा ८-० असा दणदणीत पराभव करत कांस्यपदकाला गवसणी घातली.

पुरुष हॉकी संघ – कांस्यपदक – हॉकी
१९२८ ते १९५६ या कालावधीत सलग सहा गोल्ड मेडल जिंकणारा भारत त्यावेळी हॉकीतील अजिंक्य विश्वविजेता होता. कित्येक दशकानंतर २०२० टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय संघाची कामगिरी अशीच काहीशी ऐतिहासिक होती. बलाढ्य जर्मनीचा पराभव करत भारतीय संघाने तब्बल ४१ वर्षाने ऑलिम्पिक मध्ये कांस्यपदक जिंकले. त्याअगोदर न्यूझीलंड, स्पेन, जपान यांसारख्या बलाढ्य संघांवर मात केली होती. या कामगिरीच्या जोरावर भारतीय हॉकी संघाने भारतीय हॉकीप्रेमींच्या नवीन पिढीला जन्म दिला आहे.

ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलेले भारतीय:

महिला हॉकी संघ – इंग्लंड सोबत कांस्यपदकाच्या सामन्यात पराभव
पुरुष हॉकी संघाप्रमाणेच महिला हॉकी संघाने देखील टोकियो ऑलिम्पिकमध्ये अभिमानास्पद कामगिरी केली. पहिल्या सलग तीन सामन्यात पराभवानंतर त्यांनी आर्यलँड, साऊथ आफ्रिका आणि वर्ल्डचॅम्पिअन बलाढ्य ऑर्स्ट्रेलियाला हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. परंतु पुढे अर्जेंटिना आणि इंग्लंडकडून पराभूत झाल्याने पदकांच्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. महिला हॉकी संघाकडून पदक हुकलं असलं तरी त्याच्या या कामगिरीमुळे त्यांनी भारतीय हॉकीमध्ये एक नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे.

आदिती अशोक (२३ वर्षीय) – गोल्फ – अंतिम राऊंडमध्ये चौथ स्थान
राज्य: कर्नाटक
आदिती अशोकने भारतीयांना भल्या पहाटे उठून गोल्फ पाहायला लावलं होत. जागतिक क्रमवारीत २०० स्थानी असलेल्या आदितीने अव्वल स्थानी असलेल्या अमेरिका, जपान आणि न्यूझीलंडच्या गोल्फरशी पदकासाठी शर्थीची लढत दिली होती. परंतु अखेर काही सेंटीमीटरच्या अंतराने तीच ऑलिम्पिक पदक हुकलं. माझ्या कामगिरीमुळे जर मोठ्या संख्येने भारतीय गोल्फ पाहायला लागले असतील तर अगदी उत्तम आहे, असे प्रसार माध्यमांशी बोलताना आदिती अशोक म्हणाली होती.

दीपक पुनिया (२२ वर्षीय) – कुस्ती – कांस्यपदकाच्या सामन्यात पराभव
राज्य: हरियाणा
आपलं पाहिलं ऑलिम्पिक खेळणाऱ्या दीपक पुनिया ने ८६ किलो वजनी गटात कांस्यपदक सामान्यांपर्यंत मजल मारली होती. परंतु या सामन्यात काही सेकंद उरलेले असताना विरोधी खेळाडूला पॉईंट दिल्याने दीपक पुनियाचं कांस्यपदक थोडक्यात हुकलं.

भारतीय दिग्गजांचा पराभव:

मेरी कॉम (३८ वर्षीय) – बॉक्सिंग – राऊंड १६ मध्ये कोलंम्बिअन बॉक्सरकडून पराभव
राज्य: मणिपूर
सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेली आणि २०१२ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या मेरी कॉमला टोकियो राऊंड १६ मध्ये धक्कादायक पराभव पत्करावा लागला. महिला बॉक्सिन्गला भारतामध्ये प्रसिद्ध करणाऱ्या मेरी कॉमची कदाचित हि शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा होती.

दीपिका कुमारी (२७ वर्षीय) – तिरंदाजी – क्वार्टर-फायनल राऊंड मध्ये पराभव
राज्य: झारखंड
टोकियो ऑलिम्पिकच्या महिन्याभरापूर्वी पॅरिस येथे झालेल्या तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या दीपिका कुमारीकडून साऱ्या भारतीयांना पदकाची आशा होती. परंतु क्वाटर- फायनलमध्ये पराभव झाल्याने कोणत्याही पदकाविना दीपिका कुमारीला ऑलीम्पिकमधून बाहेर पडावे लागले होते.

सानिया मिर्झा (३४ वर्षीय) – महिला टेनिस दुहेरी – पहिल्या राऊंडमध्ये पराभव
राज्य: हैदराबाद
सहा ग्रँडस्लॅम किताब जिंकणारी भारताची अव्वल टेनिसपट्टू सानिया मिर्झा २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये अंकिता रैनासोबत महिला दुहेरी टेनिस स्पर्धेत सहभागी झाली होती. परंतु भारताच्या या जोडीला पहिल्याच राऊंडमध्ये युक्रेनच्या खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे आजवर चार ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळलेल्या सानिया मिर्झाचं ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न अजूनही अपूर्णच राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here