जिंदाल स्कूलच्या विद्यार्थिनींचा राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन सण साजरा
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील साळाव येथील जिंदाल स्कूलच्या विद्यार्थिनींना यावर्षीचा रक्षाबंधन सण एक वेगळाच आणि संस्मरणीय अनुभव देऊन गेला. या विद्यार्थिनींना राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राखी बांधण्याची आणि सण साजरा करण्याची संधी लाभली.
राष्ट्रपती महोदयींनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक स्वागत करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अलिबागच्या कनक श्रीकांत ओसवाल हिचाही विशेष समावेश होता. तिने व इतर विद्यार्थिनींनी राखी बांधून भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक असलेल्या या सणाची परंपरा जपत देशप्रमुखाला शुभेच्छा अर्पण केल्या.
राष्ट्रपती भवनाला भेट देणे हा अभिमानास्पद आणि स्मरणीय अनुभव मानला जातो. भारताच्या समृद्ध वारसा आणि लोकशाही मूल्यांचे हे प्रतीक असलेले हे ठिकाण राष्ट्रीय इतिहासाशी जोडणारे तसेच अप्रतिम वास्तुकलेचा आनंद देणारे आहे. अनेकांना येथे भेट देताना देशभक्तीची आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना होते. विशेष म्हणजे, कनक ही आपल्या जिल्ह्यातील पहिली जैन मुलगी असल्याची नोंद आहे, जिने राष्ट्रपती भवनात अशी संधी मिळवली आहे.
कनकने या भेटीबाबतचा अनुभव श्रीयांत ओसवाल यांना छोट्या मुलाखतीत सांगितला असून, तो व्हिडीओ ग्रुपमध्ये शेअर करण्यात आला आहे. अल्पवयात मिळालेल्या या यशामुळे तीचे हे पाऊल जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.