आक्षी, साखर गावांना उधाणाचा धोका

आक्षी, साखर गावांना उधाणाचा धोका

चार वर्षांपासून धुप प्रतिबंधक बंधाऱ्यांची मागणी; प्रशासनाकडून दुर्लक्ष

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- समुद्रकिनारी वसलेल्या आक्षी, साखर गावांना उधाणाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरी सुरक्षेच्या दृष्टीने धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, आपत्कालीन परिस्थितीत या गावांना पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने याबाबत दखल घेतली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले जाईल, असा इशारा सरपंच रश्मी पाटील यांनी दिला आहे.

अलिबाग तालुक्यातील आक्षी हे पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचे गाव आहे. अलिबाग शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी हे गाव वसले आहे. आक्षीमध्ये पर्यटकांची वर्दळ कायमच असते. शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी व अन्य सुटटीच्या हंगामात लाखोच्या संख्येने पर्यटक आक्षीला पसंती दर्शवितात. आक्षीमध्ये अनेक हॉटेल, कॉटेजेस आहेत. याशिवाय मासेमारी करणारा वर्गदेखील आक्षी, साखरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविला जातो.

एक ऐतिहासिक भूमी म्हणून आक्षीकडे पाहिले जाते. रायगड जिल्ह्यातील आक्षी गावात मराठी भाषेतील सर्वाच प्राचीन शिलालेख सापडला आहे. आक्षीला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे. आक्षीतील पर्यटनाला पर्यटक अधिक पसंती देतात. त्यामुळे आक्षीमध्ये दर आठवड्याला साधारणतः पाचशेहून अधिक पर्यटक भेट देतात असल्याची माहिती समोर येत आहे. वर्षाला दोन लाखाहून अधिक पर्यटक आक्षीमध्ये फिरण्यासाठी येतात. आक्षी गावासह साखर, रायवाडी परिसरात तीन हजारहून अधिक नागरिक राहतात. परंतु याच नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रशासन उदासीन असल्याचे समोर आले आहे. आक्षी समुद्रकिनाऱ्यावरील साखर व रायवाडी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लाटांचा मारा बसत आहे. या उधाणामुळे येथील किनाऱ्याची धुप होत आहे.

किनाऱ्यावरील गावांना भविष्यात उधाणाचा धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. धुप प्रतिबंधक बंधारा उभारण्यासाठी शासनाकडे गेल्या पाच वर्षापासून मागणी केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या मागणीचा प्रस्ताव धुळखात आहे. त्याची अद्यापही प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. जिल्हा प्रशासनासह शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकवेळा पत्र देऊन पुन्हा धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.

वारंवार शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. शासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. बंधारा बांधला नाही, तर समुद्रातील पाणी गावात शिरून पुरपरिस्थिती निर्माण होण्याची भिती आहे. नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. सतत उधाणाबरोबरच लाटांच्या माऱ्यामुळे किनाऱ्याची धुप होऊ लागली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

रश्मी पाटील
सरपंच, आक्षी