वाघ्रण गाव झाले गणेश मूर्तींचे दुसरे माहेरघर
15 चित्र शाळा अन 3500 मूर्तींची निर्मिती
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- पेण तालुका गणपतीमूर्तींचे माहेरघर म्हटले जाते. मात्र दुसरे माहेर घर कोणते असा प्रश्न उपस्थित झाला तर नक्की अलिबाग तालुक्यातील वाघ्रण गावाचे नाव पुढे येईल. या गावात 15 चित्र शाळांतून तब्बल 3500 गणेश मूर्तींची निर्मिती होते. या ठिकाणच्या पद्माकर पेंटर यांच्या मूर्ती परदेशात तसेच दिल्लीच्या महाराष्ट्र सदनासह पुणे ,मुंबई येथे पाठवण्यात येत असत. प्लास्टर ऑफ पॅरिस वरील बंदी निर्णय उशिरा झाला. त्या मुळे परदेशात मूर्ती पाठवण्यात अडचण निर्माण झाली असली तरी ती मागणीमध्ये मात्र खंड नाही. कोकणात पारंपारिक आणि घरगुती गणेशोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. कोकणवासी यांचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव आता केवळ २० दिवसांवर आल्याने तालुक्यात अनेक गावातून बाप्पांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. शिवाय गावागावातील चित्र शाळेतून मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची घाई सुरू असून ठीक ठिकाणी च्या मूर्ती रवाना करण्यात आले आहेत. वाघ्रण गावात 15 गणेश मूर्ती कारखान्यांपैकी स्व. जे.जे. पाटील यांची श्री गणेश चित्रकला सर्वात जुनी असून, ११७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांची मुले हेमंत पाटील आणि मनोहर पाटील वडिलांचा वारसा पुढे चालवत असून २७० मूर्ती त्यांनी तयार केले आहेत.
स्व. पद्माकर पेंटर नावाजलेले मूर्तिकार असून, त्यांच्या मूर्ती परदेशात पाठविल्या जातात. मीनाक्षी पाटील मंत्री असताना दिल्लीच्या महाराष्ट्रसदन मध्ये सलग दोन वर्ष स्व. पद्माकर यांनी बनवलेली गणेश मूर्ती बसविण्यात आल्या होत्या. यावर्षी पुणे ,मुंबई येथे मूर्ती पाठवण्यात आल्याचे रविराज सदानंद पाटील यांनी सांगितले. निर्भय आर्ट चित्र शाळेत ३३० गणेश मूर्ती बनवीण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या वेशभूषेत मूर्ती साकारण्यात आल्या असून, राजकीय पेहराव, कोळ्यांच्या वेशातील, छावा,सिंहाची पक्कड अश्या मूर्ती ,फुले ,मासा ,खेकडा यावर बसलेला गणेश तसेच दहीहंडी फोडणारा कृष्णाच्या रूपात गणेश अशा वेगवेगळ्या मूर्ती बनवण्यात आले आहेत. स्व. पद्माकर पेंटर यांच्याकडून मूर्ती कलेचे शिक्षण घेतले असून आज संपूर्ण कुटुंब यात मदत करीत असल्याचे मूर्तिकार आनंद धोदरे यांनी सांगितले.त्याचा मुलगा निर्भय धोदंरे हा येथून मूर्ती बनून त्या पनवेल येथे विक्रीस नेतो.
याचबरोबर जे. जे .आर्ट स्कूलचे कृष्णा पाटील यांच्या श्री गणेश चित्र शाळेत ४६ वर्षे झाले असून त्यांच्या येथे ,तसेच चेंबूर मध्ये कारखाना आहे. तेथे एक फूट ते पंधरा फुटाच्या पाचशेहून अधिक गणेश मूर्ती बनत आहेत. अभिनेता राज कपूर, दिवंगत मंत्री प्रमोद महाजन यांच्या घरातील गणेश येथेच बनले जातात. त्यांच्या अनेक मूर्ती परदेशात, तसेच काश्मीर सीमेवर भारतीय सैनिकांच्या छावणीत जातात. त्यांच्या मूर्तिकला आणि चित्रकला या कामगिरीवर त्यांना रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. दयानंद म्हात्रे यांच्या कारखान्यात 300 च्या वरती गणेशमूर्ती बनत असून, त्यांच्या मोठ्या मूर्तींची मागणी जात असते.त्याच्या व्यवसायात जेजे आर्ट्स स्कूल मधून पदवी घेतलेला त्याचा मुलगा प्रथमेश म्हात्रे सहकार्य करीत आहे.
तसेच इतर श्री गणेश कार्यशाळा मध्ये अंकुश पाटील (१७०), ओंकार पाटील (१५०), निर्भय धोदरे (१३०), राजेंद्र म्हात्रे (३५०), प्रतीक पाटील (१२५), मनोज पाटील (१००), कौस्तुभ पाटील(१००),सचिन पाटील(७०),स्वप्नील पाटील(५५)
संदीप पाटील (१३५), तसेच इतर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मूर्ती घडविण्याचे व रंगकाम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.
वाघ्रण गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावाने कलाकार ,नाट्यकर्मी दिले असून अनेक वकील, डॉक्टर,शिक्षक, इंजिनिअर या गावात तयार झाले आहेत.तालुक्यात उच्च शिक्षित,कलाकाराचे गाव म्हणून ओळखले जाते.गावात पिढीजात १५हून अधिक श्री गणेश निर्मिती कार्यशाळा आहेत.या कार्यशाळेत त्याची तिसरी पिढीही पुढे येऊन आपला व्यवसाय आनंदाने जपत आहेत.
श्री.कृष्णकांत पाटील
अध्यक्ष
ग्रामस्थ मंडळ वाघ्रण